आपण यांना पाहिलंत का?
By admin | Published: June 28, 2014 11:18 PM2014-06-28T23:18:19+5:302014-06-28T23:18:19+5:30
पद- तलाठी. काम- विविध उपयोगी दाखले देणे. कार्यक्षेत्र- ठरवून दिलेली गाव मुख्यालये. जिल्हाभरातील गावागावांत कार्यरत असलेले बहुतांश तलाठी ऐन पेरणी व शाळा प्रवेशाच्या हंगामात बेपत्ता झाले आहेत.
जिल्हाभरात तलाठी बेपत्ता : विद्यार्थी, शेतकऱ्यांचे हाल, जिल्हाधिकाऱ्यांचे अभय
अमरावती : पद- तलाठी. काम- विविध उपयोगी दाखले देणे. कार्यक्षेत्र- ठरवून दिलेली गाव मुख्यालये. जिल्हाभरातील गावागावांत कार्यरत असलेले बहुतांश तलाठी ऐन पेरणी व शाळा प्रवेशाच्या हंगामात बेपत्ता झाले आहेत. आपणास ते कुठेही आढळल्यास कृपया , जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना सूचित करा.
आवश्यक दस्ताऐवजांसाठी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना तलाठ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. पीक कर्जासाठी आवश्यक दाखले, फेरफार, सातबारा आदींसाठी तलाठ्यांकडे जावेच लागते. परंतु पहिल्या खेपेत काम झाल्याचा अनुभव कोणीच व्यक्त केला नाही. एकवेळ मंत्रालयातील काम वेळेवर होईल. पण, तलाठी कार्यालय नको रे बाप्पा!अशाच प्रतिक्रिया उमटतात. संपूर्ण जिल्हाभरात शनिवारी ‘लोकमत’चमूने राबविलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून हे सत्य उघडकीस आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तरी तलाठी कार्यालयात उपस्थित असतील आणि आपले काम होईल, या आशेने हातात पिशवी घेऊन अर्धशिक्षित शेतकरी तलाठी कार्यालयाच्या उंबरठ्याशी पोहोचतात. पण, त्यांची निराशाच होते. सुरूवातीला सामना होतो तो तलाठी कार्यालयातील दलालांचा. १४ तालुक्यांमधील तलाठी कार्यालयांमध्ये रिक्त पदे आहेतच. महत्त्वाचे दस्तऐवज असुरक्षित आहेत. एकाच तलाठ्याकडे अनेक साझ्यांची जबाबदारी असल्याने नागरिकांना एकाच कामासाठी हेलपाटे घ्यावे लागतात. अमरावतीच्या तलाठी कार्र्यालयाची जवळपास अशीच स्थिती आहे. एकाच फेरीत या कार्यालयात तलाठी भेटतीलच याची शाश्वती नाही.