रात्रभरात झाले होत्याचे नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:32+5:30
बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, त्यातही निसर्गाने साथ दिली नाही. उभ्या सोयाबीन पिकामध्ये रोटाव्हेटर चालवावा लागला. अतिवृष्टीने ज्वारी काळी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा (शहीद) : कडाक्याची थंडी आणि दवाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. रात्रभरात दवाने शेतकऱ्यांची हिरवीगार पिके करपून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, त्यातही निसर्गाने साथ दिली नाही. उभ्या सोयाबीन पिकामध्ये रोटाव्हेटर चालवावा लागला. अतिवृष्टीने ज्वारी काळी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. कपाशी व तुरीचे पीक समाधानकारक दिसत असतानाच दवाच्या प्रादुर्भावाने बळीराजाच्या आशेवर पाणी फेरले गेले. ऐन भरात असलेल्या तुरीवर दव पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार असल्याने त्याचा हिरमोड झाला.
यावर्षी मक्याच्या उत्पादनात सार्वत्रिक घट असल्याने त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे. यामुळे काहींनी रबी हंगामात मक्याची लागवड केली. मात्र, दवाने त्यालाही सोडले नाही. ऐन कणीस फेकण्याच्या स्थितीत असलेला मका रात्रभरात करपून गेल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील एकाच वर्षात अभूतपूर्व दुष्काळ, अनियमित पाऊस आणि आता दव असे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीन ऋतूत तीन अस्मानी संकटांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली होती. त्यांना तोंड देता-देता शेतकरी मेटाकुटीला आला असून, सरकारने अतिवृष्टीच्या मदतीतून वगळलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना निदान दवाची नुकसानभरपाई देऊन अंतिम दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नांदगाव खंडेश्वर : चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. फुलोर, कळी व शेंगा अवस्थेत असलेले तुरीचे पीक थंडीमुळे करपल्यागत झाले आहे.
नांदगाव खंडेश्वर येथील बारमुंड शिवारात तूर पिकावर दवाळ गेल्याचे नांदगाव खंडेश्वर येथील शेतकरी पांडुरंग इखार यांनी सांगितले. याशिवाय या कडाक्याच्या थंडीचा कांद्याच्या रोपावरही परिणाम झाला असून, रोपाचे शेंडे करपले आहे. सध्या प्रत्येक शेतात दिवसभर शेकोटी पेटल्याचे चित्र आहे.
चांदूर बाजार, नांदगावातही पिकांना फटका
चांदूर बाजार : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात उभ्या केलेल्या खरीप व रब्बी पिकांना नववर्षात अवकाळी मुसळधार पावसाने झोडपले. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणाने पिकांवर संकट कोसळले असताना, पावसासह वातावरणात पसरलेल्या गारठ्याने पिकांची दैना केली आहे.
तालुक्यात सध्या हरभरा, तूर, कांदा, गहू पिके चांगलीच बहरली आहेत. अशातच नववर्षात पावसाने सकाळीच दमदार हजेरी लावल्याने या पिकांना मोठी झळ पोहोचली आहे. एकीकडे मुसळधार अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे बोचरी थंडी यामुळे शेतकरी व मजूर वर्ग शेतात जाण्याचाही कंटाळा करीत आहेत. या अवकाळी पावसाचा परिणाम संत्रा पिकावरसुद्धा झाला आहे. झाडावर असलेला संत्रा गळू लागला आहे. ऐन तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने हजेरी लावल्याने पीक जमिनीकडे झेपावत आहे. यासोबतच कपाशी या पिकालाही पावसाचा चांगलाच फटका बसला असून, कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झाल्याची शेतकऱ्यांची तक्रारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे बहरलेल्या तुरीच्या शेंगांमध्ये अळीचे प्रमाणही वाढले आहे. शेतात सध्या रबीची गहू, कांदा ही नाजूक पिके असून, जोमात बरसल्या अवकाळी पावसामुळे कांदा पीक जमिनीतच सडत आहे, तर गहू शेतातच जमिनीवर लोळला आहे. थंडी कितीही राहू देत, पण ढगाळ वातावरण नको, अशी शेतकरी वर्ग मनोमन प्रार्थना करीत आहेत.