विमानतळाच्या वळण रस्ता निर्मिती दर करारात तफावत
By Admin | Published: February 1, 2015 10:47 PM2015-02-01T22:47:27+5:302015-02-01T22:47:27+5:30
अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असून त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र एकाच रस्त्याच्या निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३.५० कोटी तर विमानतळ प्राधिकरणाच्या आयसीटीआय या एजन्सीने १० कोटींचे दर ठरविल्याने शासन या प्रकरणी गांभीर्याने विचार करीत आहे. रस्ता निर्मितीची निविदा फेब्रुवारी निकाली काढण्याचे संकेत आहे.
बेलोरा विमानतळाचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने आयसीटीआय ही एजन्सी विकास कामांसाठी नेमली आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणात आडकाठी ठरणाऱ्या बेलोरा ते जळू या दरम्यान पावणे चार कि.मी. लांबीच्या वळण रस्त्यााठी लागणारे दर काढण्याची जबाबदारी या एजन्सीला सोपविली. त्यानुसार आयसीटीआय वळण रस्त्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित राहील, असा अहवाल एजन्सीने राज्य शासनाच्या विमानतळ प्राधिकरणाचे सचिव टी.एस.मीना यांना दिला. दुसरीकडे याच रस्त्याच्या निर्मितीसाठी १३.५० कोटी रुपयांचे दरकरार काढून दिले आहे. रस्ता एकच तरीही खर्चाची रक्कम वेगवेगळी यामुळे विमानतळ प्राधिकरण मंत्रालय चक्रावून गेले. नेमकी यात काय गफलत? हे जाणून घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे सचिव मीना यांनी मंत्रालयात २३ जानेवारी रोजी बैठक घेऊन वळण रस्ता निर्मितीची वस्तुस्थिती जाणून घेतली असल्याची माहिती आहे. मात्र वळण रस्ता निर्मितीत अडथळा येऊ नये, यासाठी फेबु्रवारीत निविदा लावण्याची तयारी प्रशासनाची आहे. हा वळण रस्ता निर्माण करताना रुंदी वाढवून पायी जाणाऱ्यांना स्वतंत्र मार्ग तयार केला जाणार आहे. हा वळण रस्ता अकोला राष्ट्रीय महामार्गावरुन बेलोरा गावाच्या काही अंतरापासून तर जळू या गावानजिक काठला जाणार आहे. वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास त्यानंतर यवतमाळ, हैद्राबाद, पापळ मार्गे अमरावतीत येणाऱ्या वाहनांना या वळण रस्त्यावरुन अकोला राष्ट्रीय महामार्गावर येवून अमरावती गाठावी लागणार आहे. राज्य शासन विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असून बेलोरा विमानतळाच्या विकासाचे भाग्य कधी उजाळणार असा सवाल निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)