आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानात भेदभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:04 PM2017-10-27T17:04:34+5:302017-10-27T17:11:38+5:30
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला आदिवासी विभाग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व भोजन अनुदानात भेदभाव करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला आदिवासी विभाग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व भोजन अनुदानात भेदभाव करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनुदानित आश्रमशाळांना शासकीय आश्रमशाळांच्या चौपटीने कमी अनुदान मिळते आहे.
राज्यात ५५२ शासकीय, तर ५५६ अनुदानित विविध संस्थांमार्फत आश्रमशाळा चालविण्यात येतात. पाच पब्लिक स्कूल आणि इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा आहेत. अनुदानित आश्रमशाळांना प्रतिविद्यार्थी दरमहा ९०० रुपये अनुदान मिळते, तर शासकीय आश्रमशाळांमध्ये याच सुविधांसाठी ३६०० रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महर्षी शाळांसाठी ७५०० रुपये अनुदान शासनातर्फे मिळते.
भोजन अनुदान नाही
आश्रमशाळा संहिता नियमानुसार अनुदानाचा पहिला व दुसरा हप्ता एप्रिल ते जून, तिसरा हप्ता आॅक्टोबर, तर चौथा हप्ता जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत देण्याचे नमूद आहे. अनुदानित आश्रमशाळांना अल्प अनुदान प्रतिविद्यार्थी दिल्या जात असतानाच शैक्षणिक सत्र संपूनसुद्धा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी कार्यालयाने दोन वर्षांपासून अनुदान दिलेले नाही.