अमरावती विद्यापीठात ‘डिजिटल लॉकर्स’ प्रणाली, जगात कोठेही मिळणार दस्तऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 05:34 PM2017-09-08T17:34:15+5:302017-09-08T17:34:15+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परदेशातही त्यांचे शैक्षणिक दस्तऐवज क्षणात उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था डिजिटल लॉकर्स प्रणालीद्वारे करण्यात आली आहे
अमरावती, दि. 8 - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परदेशातही त्यांचे शैक्षणिक दस्तऐवज क्षणात उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था डिजिटल लॉकर्स प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (सीडीएसएल व्हेन्चर्स) सोबत करार झाला असून, विद्यापीठाने पेपरलेस कारभाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
राज्यातील सर्वच विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकर्स उपलब्ध करून द्यावेत, अशा केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार परीक्षा विभागाने हे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित रहावीत आणि ती त्यांना कुठल्याही ठिकाणी केव्हाही उपलब्ध व्हावीत, यासाठी ‘सीडीएसएल व्हेन्चर्स लिमिटेड’सोबत २१ जुलै २०१७ मध्ये करार करण्यात आला आहे. यंदा प्रथमच चालू शैक्षणिक वर्षाचे दस्तऐवज डिजिटल लॉकर्स प्रणालीतून विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. सन २०१९ पर्यंत ही एजन्सी कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकर्स प्रणालीतून शैक्षणिक दस्तऐवज देणार असल्याचा करार झाला आहे.
यासाठी चालू वर्षाचा डेटा डिजिटल लॉकर्स प्रणालीत जमा करण्यात आला आहे. डिजिटल स्वाक्षरीने शैक्षणिक दस्तऐवज दिले जाणार असून त्याकरिता विद्यापीठाने उपकुलसचिव दर्जाचे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. जगात कोणत्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे एका ‘क्लिक’वर मिळतील. यापुढे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्तऐवज डिजिटल लॉकर्समध्ये जमा केले जातील. तत्पूर्वी पुढील आठडवड्यात संबंधित यंत्रणेमार्फत या व्यवस्थेचे प्रात्यक्षिक होणार असल्याची माहिती आहे.
गेट-वे प्रणालीने पेमेंट करताच मिळतील दस्तऐवज
अमरावती विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे आता डिजिटल डिपॉझिटवर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी गेट-वे प्रणालीद्वारे आॅनलाइन शुल्क अदा केल्यास लॉकर्समध्ये असलेले शैक्षणिक दस्तऐवज क्षणात मिळतील. त्याकरिता विद्यार्थ्यांना कोड क्रमांक दिला जाईल.
‘‘विद्यापीठाचा कारभार आधुनिक आणि डिजिटाईज्ड व्हावा, यासाठी अनेक योजना, उपक्रम सुरु केले आहेत. पेपरलेस कारभारासाठी डिजिटल लॉकर्स प्रणाली येत्या आठवड्यापासून सुरु होईल.
-जयंत वडते,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ विद्यापीठ