मेळघाटात डिजिटल व्हिलेजचा फज्जा, आय सेंटर, पॉस मशीन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 06:20 PM2017-11-15T18:20:07+5:302017-11-15T18:21:43+5:30
धारणी/ हरिसाल : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा अचानक दौरा केला.
श्यामकांत पाण्डेय
धारणी/ हरिसाल : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा अचानक दौरा केला. डिजिटल व्हिलेजमधील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नाहीत, याचे ते प्रत्यक्षदर्शी ठरले. लोकमतने देशातील पहिले डिजिटल व्हिलेजमधील समस्या व हरिसालमधून रोजगारासाठी स्थालांतर होत असल्याचे वृत्त १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. यानंतर अधिका-यांनी सारवासारव करण्यासाठी माहिती अधिका-यांच्या नेतृत्वात एका पथकाने भेट दिली होती.
अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी साध्या गाडीत आपल्या सहका-यांसमवेत हरिसालपर्यंतचा प्रवास केला. येथील प्रकल्पांची माहिती घेतली.
हरिसालमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आॅनलाइन सेवा देणारे कंटेनर बंद होते. तसेच सीटीसी व आय सेंटर एकाच ठिकाणी असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासोबतच आय केअर सेंटरसाठी आणलेली मशीन धूळ खात असल्याने त्यांनी प्रभारी अधिका-यांना बोलावले. मात्र प्रभारी चिखलदरा येथे शासकीय कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. येथील डॉ. प्रियंका कंटाळे यांनी आय केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. त्यांनी लगेच जिल्हा आरोग्य अधिका-यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन ई-लर्निंगची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.
तपासणी झाली, औषधे मिळाली नाही
परदेशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला रुग्णांशी संवाद साधला. त्यांची तपासणी झाल्याचे सांगितले. मात्र ढाकणा येथील जमुना मनोज धांडे या महिलेने औषध मिळाले नाही, अशी तक्रार करताच अतिरिक्त जिल्हाधिकारी अवाक झाले. त्यांना महिलेस उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते. येथील नेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने पॉस मशीनचा लाभ मिळत नाही. अनेक प्रयत्नानंतरही मशीन दुरुस्त झाली नाही. यामुळे आॅनलाइन व्यवहार करावे तरी कसे.
- सईद खान,
व्यावसायिक, हरिसाल
हरिसालमध्ये यंत्रणा सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. यात सुधारणा करण्याची गरज आहे. संबंधित सर्व विभागांना माहिती देण्यात येईल.
- खुशालसिंग परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अमरावती