डिजिटल व्हिलेज हरिसालला विकासाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2016 12:17 AM2016-02-16T00:17:47+5:302016-02-16T00:17:47+5:30
देशातील पहिले डिजिटल होण्याचा बहुमान मेळघाटातील धारणी तालुक्यातील हरिसाल गावाला मिळाला.
अनेक समस्यांचा खच : पाणीप्रश्न चांगलाच पेटला
धारणी : देशातील पहिले डिजिटल होण्याचा बहुमान मेळघाटातील धारणी तालुक्यातील हरिसाल गावाला मिळाला. राष्ट्राचे पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी डिजिटल व्हिलेज म्हणून पहिला बहुमान मेळघाटला दिला. मेळघाटातील चित्र आतापर्यंत ज्या पद्धतीने कुपोषणामुळे कुप्रसिद्ध झाला होता ते कुपोषणाचे कलंक पुसण्यासाठी व मेळघाटला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगाशी जोडण्याचा केंद्र व राज्य शासनाचा निर्णय कौतुकास्पद आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून डिजिटल व्हिलेजची घोषणा होऊनही त्या दृष्टीने कोणतेच उल्लेखनीय पाऊल उचलण्यात आले नाही. हरिसाल येथील ग्राम सचिवालयात एका खोलीमध्ये डिजिटल व्हिलेजच्या कार्यालयाची स्थापना झाली. त्यात मोठमोठे सोफे व टेबल-खुर्च्या लावले गेले. मात्र त्या खुर्चीवर बसून काम करण्यासाठी कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने हे कार्यालय क्वचितच उघडले जाते. सध्या याची जबाबदारी तलाठी व त्याचे कोतवालकडे देण्यात आले आहे. या तलाठ्याकडे १३ गावांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचे लक्ष आपल्या गावातील शेतकऱ्यांचे सातबारा व इतर कामातूनच सरत नसल्याने ते डिजीटलच्या कार्याकडे ढुंकुनही पाहू शकत नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अजेंड्यात असलेला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर उपविभागीय अधिकारी २५ किमी दूर धारणीत बसून लक्ष ठेवीत आहे. प्राथमिक स्तरावरील कार्यालय व डिजिटल साहित्य ठेवण्याचे साहित्यासाठी दोन खोल्यांची सोय तत्कालीन एसडीओ व्यंकट राठोड यांनी केले आहे, तर सध्या भारतीय प्रशासनिक सेवेतील नवनियुक्त अधिकारी षणमृगराजन एल. हे या बाबींकडे लक्ष ठेवून आहे. (तालुका प्रतिनिधी)