३० हजार वारकऱ्यांची आज दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:24 PM2018-01-19T23:24:15+5:302018-01-19T23:25:03+5:30

रेवसा नजीकच्या १२ एकरावर २१ जानेवारीला ३० हजार गजाननभक्त एकाच वेळी महापारायण करणार आहेत.

Dindi today, 30 thousand warkari | ३० हजार वारकऱ्यांची आज दिंडी

३० हजार वारकऱ्यांची आज दिंडी

Next
ठळक मुद्देउद्या रेवसा येथे महापारायण : एक लाख भाविक घेणार महाप्रसाद

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रेवसा नजीकच्या १२ एकरावर २१ जानेवारीला ३० हजार गजाननभक्त एकाच वेळी महापारायण करणार आहेत. तत्पूर्वी शनिवार, २० जानेवारीला सकाळी शहरातील मुख्य चौकांतून ३० हजार वारकऱ्यांची दिंडी निघणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी महापारायण व दिंडीत सहभागी होणार आहेत.
श्री गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण समितीतर्फे महापारायण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रेवसा नजीकच्या १२ एकर शेतामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. भक्तांच्या सेवेकरिता शहरात महाराष्ट्रीय वेशभूषेत पाच हजार सेवेकरी तैनात राहणार आहेत. पिण्याच्या पाण्यापासून तर भोजन आणि औषधाची सुविधा आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे. बसस्थानक, राजकमल चौक, बडनेरा आणि पंचवटी चौक या ठिकाणांवरून भाविकांसाठी वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या वाहनांद्वारेही प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. राज्यातील सर्व भागातून भाविक निघाले असून, दिंडी सुरू होण्यापूर्वी ते शहरात दाखल होत आहेत. पारायणस्थळी सुमारे सव्वा लाख भाविकांची व्यवस्था केली आहे.
पारायणासाठी शुभ्र वस्त्र व लाल साडी
महिलांनी शक्यतोवर लालसाडी परिधान करावी, पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा बंगाली शर्ट, पांढरा पैजामा किंवा धोतर आणि टोपी घालावी. दिडींत सहभागी होणाऱ्या महिला व युवतींनी पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा त्याच रंगाचा पंजाबी ड्रेस शक्यतोवर परिधान करावा.
नोंदणीचा महापूर
महापारायणासाठी नोंदणी हाऊसफुल्ल झाली असून, ती ३० हजारांवर गेल्याचे आयोजन समितीने कळविले. जिल्ह्याबाहेरील १८ हजार भाविकांनी नोंदणी केली. हा सोहळा विश्वबंधुत्व व सर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरल्याचे नोंदणीवरून निदर्शनास येते. सात मुस्लीम व अमेरिकेहून आठ भाविकांनीही सोहळ्यात पारायणासाठी नोंदणी केली आहे.
वाहतूक मार्गात बदल
महापारायणामुळे पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेकरिता कठोऱ्यापुढील रजनी मंगल कार्यालय ते रेवसा व राजपूत ढाबा ते चांगापूर फाटा मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविली जाणार आहे. २१ जानेवारीला सकाळी ५ ते सायंकाळी ६ या वेळेत रजनी मंगल कार्यालयाकडून पारायण स्थळी सर्व प्रकारच्या वाहनांना जाता येईल. मात्र, परत रेवसा गावाकडून कठोरा नाका किंवा वलगाव मार्गे येता येईल. राजपूत ढाबाकडून चांगापूर नार्गे वलगाव, परतवाडा, दर्यापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी नवसारी रिंगरोड चौक ते चांगापूर फाटा या मार्गाचा अवलंब करावयाचा आहे.
वारकरी होताहेत दाखल
गुरुवारपासून वारकरी भाविकांचे शहरात आगमन होत आहे. त्यांच्या निवासाकरिता शहरातील १९ मंगल कार्यालये बूक करण्यात आली आहेत. त्यांना मंडपात पोहोचण्याकरिता ६५ खासगी बसची सुविधा समितीने केली आहे.
चोख व्यवस्था
विशाल मंडपामध्ये २६ सीसीटीव्ही कॅमेरे, प्रक्षेपणासाठी चार भव्य एलईडी स्क्रीन आहेत. पारायणस्थळी हव्याप्रमंडळाचे ३०० सुरक्षा रक्षक सज्ज राहणार असून शहरात जागोजागो मदत व चौकशी केंद्र उघडण्यात आले आहे.

Web Title: Dindi today, 30 thousand warkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.