ई-पीक पाहणी प्रात्यक्षिकात जिल्हाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:17 AM2021-08-28T04:17:46+5:302021-08-28T04:17:46+5:30
अमरावती : विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजनासाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार असून, ही प्रक्रिया गतीने राबवावी व ...
अमरावती : विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजनासाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार असून, ही प्रक्रिया गतीने राबवावी व शेतकरी बांधवांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.
अचलपूर तालुक्यातील नरसाळा येथे भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: या प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्येक बाबीची माहिती घेतली व अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, मंडळ अधिकारी अनिल पोटे, तलाठी जगदीश पानसे आदी यावेळी उपस्थित होते.
ई-पीक पाहणी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर अचलपूर तालुक्यात सर्वप्रथम राबविण्यात आला. आता तो जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. पीक पेरणी अहवालाचा 'रियल टाइम क्रॉप डेटा' संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग मिळवणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने हा ई-प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ई-पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कौर यांनी दिले.
----------------
पुनर्वसित गावांची पाहणी
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी चांदूर बाजार तालुक्यातील मोजखेडा व अचलपूर तालुक्यातील वडुरा येथील पुनर्वसित वस्तीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याची टाकी आदी कामांबाबत आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी तालुका प्रशासनाला दिले.