पाणीटंचाई ग्रस्त गावाना स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला वस्तुनिष्ठ अहवाल
By जितेंद्र दखने | Published: May 7, 2024 09:41 PM2024-05-07T21:41:00+5:302024-05-07T21:41:37+5:30
टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.
अमरावती : सध्या एकीकडे कडक उन्हाळा तापत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्याही दिवसेदिवस वाढत आहेत. त्यामुळे टॅकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावात महसुलसह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्या बैठकीत शुक्रवारी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.
सध्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी टंचाईची समस्या चांगलीच पेटली आहे. परिणामी जिल्हाभरातील अनेक गावात खासगी विविर अधिग्रहण व ८ गावात ११ टॅकरने नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी पाणी टंचाईची आढावा बैठक घेतली.या बैठकीत टॅकरने पाणी पुरवठा केलेल्या गावांचा माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी चांदुर रेल्वे तालुक्यात एक़ आणि मेळघाटातील ७ आदिवासी बहूल गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली.
दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी कटियार यांनी टॅकरने पाणी पुरवठा केल्या जात असलेल्या गावांना संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना प्रत्यक्ष भेटी देवून अहवाल सादर करावा,जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी यांनीही सदर गावाला भेटी देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेवून गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टॅकरने योग्यरित्या पाणी पुरवठा होतो किंवा नाही याबाबत माहिती घेवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. याशिवाय टॅकरग्रस्त गावासाठी सुरू असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व स्वतंत्र पाणी पुरवठा योजना संबंधित विभागाने तातडीने पूर्ण करून गावे टॅकरमुक्त होतील व भविष्यात टॅकरने पाणी पुरवठा करण्याची गरज पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जनतेच्या तक्रारीची गांर्भियाने दखल घ्या
पाणी टंचाई हा अत्यंत महत्वाचा विषय असून सर्व संबंधित अधिकारी यांनी पाणी टंचाई संदर्भात नागरिकांकडून प्राप्त तक्रारीची गांर्भियाने दखल घेवून व भविष्यात ज्या गावामध्ये पाणी टंचाई सदुष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्या गानांना तातडीने भेटी देवून तेथील पाणीटंचाई बाबत परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
या गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा
ग्रामीण भागात सध्या उन्हाळयाचे दिवसामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे.आजघडीला चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला,मोथा, खडीमल,धरमडोह, आकी,बहादरपूर व गौलखेडा बाजार आदी गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली.