बाजार समिती सचिवाविरुद्ध कारवाईचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:41+5:302021-07-14T04:16:41+5:30
लोकमत इम्पॅक्ट डीडीआर यांचे सभापतींना पत्र परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती सरळसेवा नोकरभरती प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सचिव ...
लोकमत इम्पॅक्ट
डीडीआर यांचे सभापतींना पत्र
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती सरळसेवा नोकरभरती प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सचिव पवन सार्वेविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी बाजार समितीच्या सभापतींना पाठविले आहे. त्यामुळे आता सचिवाविरुद्ध कुठलीही कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषिउत्पन्न बाजार समिती, अचलपूर येथील सरळ सेवा भरतीसंबंधाने झालेल्या तक्रारीनुसार, पोलीस चौकशीअंती दोषी आढळून आलेले बाजार समितीचे सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला, लता बाजपेयी यांंच्याविरुद्ध बाजार समितीने परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध २१ डिसेंबर २०२० रोजी कलम ४२०, ४६५, ४७१, ४६८ व ३४, १२० ब गुन्हा नोंदविला. त्यानुसार बाजार समिती संचालक मंडळ सभा २६ डिसेंबर २०२० मध्ये ठराव पारित करून दिनांक २८ डिसेंबर २०२० च्या आदेशान्वये तिघांना यांना निलंबित केले होते. त्यानंतर सर्व संचालक मंडळ व सचिव पवन सार्वे यांच्याविरुद्धसुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केले, हे विशेष. परंतु, महिना लोटूनसुद्धा सचिव पवन सार्वे यांचे निलंबन करण्यात आले नाही.
बॉक्स
सचिव सार्वेंना केव्हा निलंबित करणार?
कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव पवन भीमराव सार्वे हे आस्थापनेवरील कर्मचारी असल्याने गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्यासाठीसुद्धा तोच शासकीय नियम आहे. असे असताना बाजार समिती त्यांना का पाठीशी घालत असल्याचा आरोप माजी उपसभापती कुलदीप काळपांडे यांनीसुद्धा लोकमतचा दाखला देत जिल्हा उपनिबंधक यांना तक्रार दाखल केली होती. त्यावरून सभापतींना आदेशित करणारे पत्र पाठविण्यात आले असून, पवन सार्वे यांचे निलंबन केव्हा, यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
बॉक्स
लोकमतने विचारला होता निलंबनाचा प्रश्न
संचालक मंडळ व सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल होताच पवन सार्वे यांना निलंबित केव्हा करणार, या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. जिल्हा उपनिबंधकांनी सभापतींना यासंदर्भात माहिती घेऊन पत्र देणार असल्याचे सांगितले होते.