अधिकाऱ्यांना गाव मुक्कामाचे निर्देश
By admin | Published: April 5, 2015 12:16 AM2015-04-05T00:16:28+5:302015-04-05T00:16:28+5:30
बेंबळा प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना गाव मुक्काम करुन..
पालकमंत्री : पुनर्वसनग्रस्तांसाठीचे पाऊ ल
अमरावती : बेंबळा प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना गाव मुक्काम करुन तेथील समस्या जाणून घेण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तायडे, उपकार्यकारी अभियंता निवद, उपविभागीय कार्यकारी अधिकारी मंगेश व्यवहारे, उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते आदी उपस्थित होते.
बेंबळा प्रकल्पामुळे आठ गावे प्रभावित झाली असून त्यांचे पुनर्वसनाचे काम २००७ पासून सुरु झाले आहे. पुनर्वसित गावांच्या भूसंपादनासाठीचा निधी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ७२ कुटुंबांचे पुनर्वसन व सदोष काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणे या चार मुद्यांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने घुईखेड व ऐरंड या दोन गावांमध्ये आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नादुरुस्त टँकरची दुरुस्ती करुन घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. पुनर्वसनाच्या कायद्यानुसार गावांमध्ये १८ नागरी सुविधा देण्यासंबंधी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.