जिल्हाधिकाऱ्यांकडे आज रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालक जमा करणार चाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 05:00 AM2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:01:08+5:30
अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सरकारने कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांसाठी शिथिलतेसह नवे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रेस्टॉरेंट, हॉटेलच्या वेळेबाबत कमालीचा अन्याय केला आहे. व्यवसायाच्या वेळेतच रेस्टॉरेंट, हॉटेलचे शटर बंद करण्याचे आदेश निर्गमित केल्यामुळे शुक्रवारी शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेलच्या चाव्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे. यात हॉटेल व्यवसायावर वेळेची मर्यादा पूर्वक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार खूष आणि हॉटेल संचालक नाराज अशी स्थिती आहे.
कोरोनाकाळात गत दीड वर्षांत हॉटेल, रेस्टॉरेंट व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा आणि सकाळी १० ते रात्री ११ या वेळेदरम्यान रेस्टॉरेंट, हॉटेलला परवानगी मिळेस्तोवर चाव्या जिल्हा प्रशासनकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवेदन सादर करताना नितीन मोहाेड, नितीन देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, गजानन राजगुरे, सारंग राऊत, समीर देशमुख, नितीन कदम, गुड्डू धर्माळे, संजय छाबडा, मदन जयस्वाल, नंदू जयस्वाल, सत्यपालसिंग अरोरा, अब्दुल हबीब हुसैन, नमन सलुजा उपस्थित होते.
दरम्यान, अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनने ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाला राणा दाम्पत्याचा पाठिंबा आहे.
रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसाय असलेल्या वेळेतच बंद करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, हे समजणे कठीण झाले आहे. कामगार, वेटर, मजुरांचा दैनंदिन खर्च लागू आहे. परिणामी व्यवसाय न करता प्रतिष्ठानांच्या चाव्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आज जमा करण्यात येतील.
- नितीन मोहोड
रेस्टॉरेंट व्यावसायिक