बडनेऱ्यात नळावाटे घाण पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 03:45 PM2021-12-10T15:45:11+5:302021-12-10T15:55:26+5:30
नळ आल्यानंतर तासभर शुद्ध पाणी येण्याची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. नळातून शौचालयाचे घाण पाणी येत असल्याची ओरड आहे. मजीप्राच्या बडनेरा अभियंत्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे. मात्र, संबंधित अभियंता केवळ ‘टाईमपास’ करीत आहे.
अमरावती : येथील नवी वस्तीच्या भागात नळावाटे घाण पाणी येत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही ही गंभीर समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते सोडवत नाही. त्यामुळे आता अभियंत्यांनाच काळे फासू, असा गर्भित इशारा नागरिकांनी दिला आहे.
नवी वस्तीच्या पवननगर, सिंधी कॅम्प, इंदिरानगर, आदिवासीनगर, पंचशीनगर, कुरेशनगर, मारवाडीपुरा आदी भागात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, घरगुती अथवा सार्वजनिक नळातून घाण पाणी घेते. नळ आल्यानंतर तब्बल तासभर शुद्ध पाणी येण्याची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. नळातून शौचालयाचे घाण पाणी येत असल्याची ओरड आहे. मजीप्राच्या बडनेरा अभियंत्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे. मात्र, संबंधित अभियंता केवळ ‘टाईमपास’ करीत आहे.
नवीवस्तीच्या जलकुंभावर काही दिवसांपूर्वी महिला वर्गाने धडक दिली होती. तरीही नळावाटे घाण पाणी बंद झाले नाही. आता गत चार ते पाच दिवसांपासून अतिशय काळसर पाणी नळावाटे येत आहे. सिंधी कॅम्प, इंदिरानगर, आदिवासीनगरातील सार्वजनिक आणि घरगुती नळावाटे शौचालयाचे घाणपाणी येत आहे. हे पाणी पिण्यास जात असल्याने आरोग्याचा धाेका बळावला आहे. येत्या दोन दिवसांत घाण पाण्याची समस्या सोडविली नाही, तर बहुजन वंचित आघाडी संबंधित अभियंत्यांना काळे फासणार, असा गर्भित ईशारा देण्यात आला आहे.
बडनेरात तीन महिन्यांपूर्वीदेखील पाणीपुरवठा अनियमित होत असल्याबाबत महिलांनी माजीप्राच्या कार्यालयावर धडक दिली होती. आता काही दिवसांपासून नळावाटे येणाऱ्या घाण पाण्यापासून नवी वस्तीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रश्न आरोग्याशी निगडीत असल्याने तो लवकर सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नळावाटे अतिशय घाण पाणी येत आहे. कुठल्या तरी शौचालयाच्या टाक्यातून हे पाणी जलवाहिनीतून येत आहे. याबाबत मजीप्रा अभियंत्यांना अवगत केले आहे. आता थेट हल्लाबोल करून अभियंत्यांनाच काळे फासू.
- अल्पेश वानखडे, सदस्य, बहुजन वंचित आघाडी, बडनेरा
भुयारी जलवाहिनी तपासल्या जातील. ज्या ठिकाणी लीकेज असेल, तेथे दुरुस्ती केली जाईल. पाईप लाईनची दुरुस्ती करण्याचे कंत्राट अन्य व्यक्तीला देण्यात आले आहे. त्यामुळे कामे सुरळीत होण्यास वेळ लागत आहे.लवकरच ही समस्या दूर केली जाईल
- मोरेश्वर आजने, अभियंता, माजीप्रा