दिव्यांगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; अमरावतीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:24 AM2023-02-16T10:24:18+5:302023-02-16T10:32:20+5:30
आत्मदहनाच्या इशाऱ्याने मिनी मंत्रालयाला छावणीचे स्वरूप; तीन तासांनंतर सुटला तिढा
अमरावती :दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिव्यांग बांधवांनी १५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषदेला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. जवळपास तीन ते चार तासांच्या अवधीनंतर आत्मदहनाचा इशारा देणारे कार्यकर्ते मिनी मंत्रालयात दाखल झाले आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा केली.
अपंग जनता दलाचे अध्यक्ष शेख अनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांगाना स्वयंरोजगार मिळावा, याकरिता शासनाने बीजभांडवल योजना सुरू केली आहे. यामध्ये राज्य शासनाचे २० तर बँकांकडून ८० टक्के रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता दिव्यांगांनी दोन वर्षांपासून बँकेत कर्जपुरवठ्याकरिता रीतसर अर्ज केले आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करून बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे.
नियमाप्रमाणे काम करीत नसलेल्या बँक व्यवस्थापकांविरोधात कलम ९२ नुसार गुन्हे दाखल करावेत, जिल्हा परिषदेमधील सन २०२०-२१, २०२१-२२ या आर्थिक वर्षातील बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्या करून घेतलेल्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी अपंग जनता दलाच्या जिल्हाध्यक्ष धनश्री पटोकार व शेख अनिस यांनी केली. या मागण्यांसाठी कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत सकाळपासून कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारी २ वाजताच्या सुमारास शेख अनिस, धनश्री पटोकर, शेख रुस्तम शेख बनू, प्रमोद शेबे, कांचन कुकडे, पूजा चव्हाण, शाहिस्ता परवीन मो. फारुख, शेख निसार शेख बुऱ्हाण आदींनी पोलिस बंदोबस्तात जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत विविध विषयावर चर्चा केली. यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आत्मदहन आंदोलन निवळले.
अभ्यागतांची गोची
बुधवारी सकाळी अपंग जनता दलचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १५ फेब्रुवारीला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या चारही बाजूंनी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. या बंदोबस्तामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वगळता कामानिमित्त आलेल्या कंत्राटदार तसेच नागरिकांना यामुळे जवळपास दोन ते तीस तास ताटकळत बाहेर थांबावे लागले.