नियम बदलल्याने नापसंती ; ‘आरटीई’ च्या २२ हजार जागांसाठी १३५६ अर्ज
By जितेंद्र दखने | Published: April 30, 2024 08:41 PM2024-04-30T20:41:31+5:302024-04-30T20:42:20+5:30
१० मे पर्यत मुदतवाढ : शिक्षण संचालनालयाचे निर्णयामुळे पालकांना दिलासा.
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांकरिता दरवर्षी उपलब्ध जागांच्या दुप्पट, तिप्पट अर्ज येतात. परंतु, यंदा राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने प्रतिसाद अल्प मिळत असल्याचे वास्तव आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात २२ हजार ४११ जागा उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ १ हजार ३५६ हजारांवर अर्ज ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आले आहेत. यंदा आरटीई प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्याची नोंदणीसाठी १६ ते ३० एप्रिलपर्यत मुदत होती. अशातच बुधवारी पुन्हा आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यत मुदतवाढ दिली आहे.शिक्षण संचालनालयाचे या मुदतवाढीमुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील २२ हजार ४११ जागा रिक्त आहेत.याकरीता आतापर्यत केवळ १३५६ पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. नोंदणीला मिळत असलेला अल्प प्रतिसाद लक्षात घेता. पालकांना सरकारी शाळेत आपल्या मुलांना शिक्षण नको,तर खासगी शाळेत शिक्षण हवे असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्यासाठी पुन्हा येत्या १० मे मुदतवाढ मिळाली असली तरी बदललेल्या नियमावलीनुसार आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास पालक इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्याची स्थिती
एकूण शाळांची नोंदणी - १९९८
रिक्त जागा -२२,४११
३० एप्रिलपर्यंत प्राप्त अर्ज -१३५६
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १६ ते ३० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. अशातच ही मुदत संपली असल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बुधवारी सांयकाळी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचे ऑनलाइन अर्ज करावेत.
-बुद्धभूषण सोनवणे
शिक्षणाधिकारी प्राथमिक