म्युकरमायकोसिसच्या ९४ रुग्णांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:29+5:302021-07-11T04:10:29+5:30
अमरावती जिल्ह्यात कोरोना झालेल्या २३६ रुग्णांना म्युकरमायकोसिसचा आजार जडला होता. यावर औषधोपचार फार महागडा असल्याने सर्वसामान्यांना ते परवडणारे नव्हते. ...
अमरावती जिल्ह्यात कोरोना झालेल्या २३६ रुग्णांना म्युकरमायकोसिसचा आजार जडला होता. यावर औषधोपचार फार महागडा असल्याने सर्वसामान्यांना ते परवडणारे नव्हते. त्यामुळे शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या आजाराचा समावेश करून ५ लाखांपर्यंत खर्चाची तरतूद केल्याने अनेकांना योग्य उपचार मिळू शकला. परिणामी ९४ रुग्ण यातून बरे झालेत. सद्यस्थितीत १२२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने म्युकरमायकोसिकच्या २० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.
बॉक्स
सध्या तीन मोफत सेवा केंद्र
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी जिल्ह्यात चार मोफत सेवा केंद्राची निर्मिती शासनाने केली आहे. सद्यस्थीतीत पीडीएमसी, सुपर स्पेशालिटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अशा तीन केंद्रावर मोफत सेवा दिली जात आहे. तसेच झेनिथ, रेडिएंट हॉस्पिटल आणि हायटेक येथे या आजारावर शुल्काधारित उपचार केला जात आहे.
८५ रुग्णांना योजनेचा लाभ
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या ८५ गरीब रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आला असून, या योजनेंतर अन्य रुग्णांनीदेखील मोफत औषधपाचर घेतल्याची माहिती डॉ. सचिव सानप यांनी लोकमतला दिली.
इर्विन रुग्णालयात ८ रुग्णांवर उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ७६ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला, तर ४४ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले आहेत. १३ रुग्णांना अन्यत्र उपचारासाठी हलविण्यात आले असून सद्यस्थितीत ८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.