अहवालापूर्वीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:12 PM2017-10-14T23:12:09+5:302017-10-14T23:12:38+5:30
भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीवरून त्या रुग्णाला गुरूवारी 'डिस्चार्ज' देण्यात आला. मात्र, शुक्रवारी स्वाईन फ्लूचा पॉझिटिव्ह अहवाल इर्विनला प्राप्त होताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. त्या महिलेला शुक्रवारी इर्विनमध्ये दाखल केले आणि आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली व अख्ख्या गावाची आरोग्य तपासणी करीत १५ ते २० रुग्णांना संशयित म्हणून इर्विनमध्ये दाखल केले.
प्रभा बाबूलाल कांबळे (६०) असे या रुग्णाचे नाव आहे. दसºयाच्या दिवशी ३० सप्टेंबरला या महिलेला दमा, अस्थमा, ताप व उच्च रक्तदाबामुळे आयसीयूत भरती केले होते. त्यानंतर ३ आॅक्टोबरला या महिलेला सुटी देण्यात आली. पुन्हा ४ आॅक्टोबर रोजी भरती केले. इर्विनमधून ६ आॅक्टोबरला चांदूरबाजार येथील खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले. १० आॅक्टोबरपर्यंत ती चांदूरबाजार येथील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर पुन्हा १० आॅक्टोबरला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. ११ आॅक्टोबरला त्यांच्यावर स्वाई फ्लूचे उपचार करण्यात आले. परंतु, १२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीवरून तिला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, १३ आॅक्टोबरला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली कारण सदर रुग्ण स्वाईन फ्लूसदृश असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी तत्काळ या रुग्णाला कामनापूर येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शनिवारी दुपारी त्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांच्या आष्टी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र दाळू व त्यांचे पथक कामनापुरात दाखल झाले. त्यांनी गावातील संशयितांची तपासणी करून त्यांना इर्विनला रेफर केले होते.
अख्ख्या गावाची तपासणी
कामनापूर हे ७६८ लोकसंख्येचे गाव आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर आज आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली. प्रत्येक घारत आरोग्य तपासणी यातील १५ ते २० जणांना खोकला, ताप, असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरूवातीला सदर रुग्णाला दमा, ताप, रक्तदाबामुळे इर्विनमध्ये दाखल केले होते. परंतु संशय असल्याने आम्ही ४ आॅक्टोबरला स्वाईन फ्लूची तपासणी करून त्यांचा अहवाल नागपूरला पाठविला होता. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर व त्यांनी स्वत: लेखी दिल्यानंतर या रुग्णाला सुटी दिली होती. १२ आॅक्टोबरला स्वाईनफ्लूचा अहवाल प्राप्त होताच सदर रुग्णाला आम्ही पुन्हा भरती करून घेतले होते.
-श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
कामनापूर येथे स्वाईन फ्लूचा रुग्ण असल्याचे सिद्ध झाल्याने आम्ही दक्षता म्हणून संपूर्ण गावाची पाहणी केली आहे. यातील ताप, खोकला, असलेल्या १५ ते २० जणांना इर्विनमध्ये उपचाराकरिता नेले आहे. सध्या कोणताही रुग्ण संशयीत नाही.
- सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी