प्रेमात विसंवाद; हेडफोन, पैसे परत दे, अन्यथा! कॉलेजवयीन तरूणीला धमकी, कॉलेजपर्यंत पाठलाग
By प्रदीप भाकरे | Published: December 27, 2023 01:25 PM2023-12-27T13:25:12+5:302023-12-27T13:25:20+5:30
नातेवाईकाच्या घरात धुडगुस
अमरावती: प्रेमात विसंवाद झाल्याने एका वर्गमित्राने वर्गमैत्रिणीच्या नातेवाईकाच्या घरात शिरून चांगलाच धुडगुस घातला. माझे पैसे परत दे, अन्यथा तिच्या कुटुंबाला संपविण्याची गर्भित धमकी देण्यात आली. २५ ते २६ डिसेंबरदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी पिडिताच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून २६ डिसेंबर रोजी दुपारी आरोपी गजेंद्र गोवर्धन मोहिते (२०, रा. अमरावती) याच्याविरूध्द विनयभंग व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, यातील पिडिता ही राजापेठ हद्दीतील आपल्या महेंद्र नामक नातेवाईकाकडे राहून शिक्षण घेत आहे. आरोपी गजेंद्र हा पिडित मुलीचा वर्गमित्र आहे. तो अमरावती येथे राहतो. तो आणि ती फोनवर बोलत होते. त्यानंतर त्याने पिडितास त्रास द्यायला सुरुवात केली. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याने तिच्याशी बोलणे बंद केले होते. मात्र त्यावेळी पिडिताकडे आरोपीने दिलेला हेडफोन व काही पैसे होते. त्यावर हेडफोन व पैसे परत देतो पण तू घरी येऊ नकोस, तिला त्रास देऊ नकोस, असे महेंद्र यांनी आरोपीला बजावले. मात्र फिर्यादी महेंद्र हे ड्युटीवर असतांना आरोपी त्यांच्या घरी येत होता. तथा ती मुलगी कॉलेजमध्ये जात असतांना घराजवळून तिचा वारंवार पाठलाग करीत होता. त्यामुळे पिडिताने ही बाब महेंद्र यांच्या कानचावर घातली.
दोनदा शिरला घरात
दरम्यान, २५ डिसेंबर रोजी आरोपी गजेंद्र हा महेंद्र यांच्या राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील घरात शिरला. तथा त्याने तरूणीकडे यापुर्वी दिलेल्या पैशाची मागणी करत वाद केला. तुम्ही माझ्या नावाची सुपारी दिली आहे, असा आरोप देखील त्याने महेंद्र यांच्यावर केला. त्यावेळी तो निघून गेला. २६ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा परत आला. माझे पैसे परत द्या, नाहीतर मी तुमच्या परिवाराला जिवानिशी मारुन टाकेल, अशी धमकी महेंद्र यांना दिली. शिविगाळ करुन तो अंगावर मारण्याकरीता धावला. याप्रकरणी त्यांनी लागलीच राजापेठ पोलीस ठाणे गाठले.