कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पर्यायी स्मशानभूमींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:21+5:302021-04-19T04:12:21+5:30

अमरावती : कोरोना संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी विलंब लागत ...

Discovery of alternative cemeteries for corona cremation | कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पर्यायी स्मशानभूमींचा शोध

कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पर्यायी स्मशानभूमींचा शोध

Next

अमरावती : कोरोना संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी विलंब लागत आहे. तर, मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नाही. परिणामी हिंदू स्मशानभूमीच्या संचालकांनी रविवारी येथील विलासनगर, शंकरनगर आणि फ्रेजरपुरा स्मशानभूमीची पाहणी केली. लवकरच या स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात येणार आहे.

‘लोकमत’ने १७ एप्रिल रोजी ‘स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी’ या आशयाचे सचित्र वृत्त प्रकाशित करून कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्काराप्रसंगी वास्तव लोकदरबारात मांडले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पर्यायी स्मशानभूमीचा शोध चालविला आहे. हिंदू स्मशानभूमी संस्थानचे अध्यक्ष आर. बी. अटल यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. त्याअनुषंगाने हिंदू स्मशानभूमी संस्थेच्या चमूने विलासनगर, फ्रेजरपुरा, शंकरनगर येथील स्मशानभूमीची पाहणी केली. येथे असलेल्या अंत्यविधीसाठीच्या प्राथमिक सोईसुविधा,शेड, सुरक्षितता आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी विलासनगर व फ्रेजरपुरा, शंकरनगर या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदू स्मशानभूमी संस्थानवर अंत्यविधीसाठीचा ताण कमी होण्याचे संकेत आहेत. हल्ली कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या अडीच ते तीन तासांच्या विलंबातून नातेवाईक, आप्तांना दिलासा मिळणार आहे.

-----------

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार रविवारी विलासनगर, फ्रेजरपुरा, शंकरनगर स्मशानभूमींची पाहणी केली. येथे असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. लवकरच कोरोना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे.

-आर. बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशान भूमी संस्था

----------------

रविवारपासून विलासनगर येथील स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू झाले आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत शंकरनगर, फ्रेजरपुरा स्मशानभूमीतही नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली आहे.

-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.

Web Title: Discovery of alternative cemeteries for corona cremation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.