'अमरावती फिमेल एस्कॉर्ट' वर घेतला जातोय 'हा' शोध! धडाक्यात सुरू आहे ऑनलाईन रेडलाईट एरिया..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 08:20 PM2021-12-01T20:20:31+5:302021-12-01T20:22:37+5:30
Amravati News प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून ‘अमरावती फिमेल एस्कॉर्ट’ची लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
अमरावती : ऑनलाईन जगरहाटीत अनेक व्यवसाय आज संकेत स्थळावरून हाताळली जातात. नानाविध उत्पादने संकेत स्थळाच्या भरवशावरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. त्याला ‘कुंटणखाना’देखील अपवाद राहिलेला नाही. त्या काळ्या जगातील अनेक तस्कर, दलाल लिंक आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. आज तर शय्यासोबत करण्यासाठी इंटरनेट सर्च केल्यास अमरावतीमध्येही ‘ऑन कॉल’ मुली मिळू शकतात, हे भयानक वास्तव उघड झाले आहे.
शहराच्या विशिष्ट भागात ‘चोरीचुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून ‘अमरावती फिमेल एस्कॉर्ट’ची लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यात अमरावतीच्या मुली म्हणून अनेकांची प्रोफाईल टाकली गेली आहेत. कळस म्हणजे, त्यात संबंधित मुलींचे व्हॉट्सॲप व मोबाईल क्रमांक असल्याने या काळ्या धंद्यांची पाळेमुळे खूप खोलवर रुजल्याची प्रचिती येते.
काय करू शकते सायबर पोलीस?
अशा संकेत स्थळांची सर्व माहिती मिळविणे सायबर सेलसाठी आव्हान आहे. सबंधित संकेत स्थळांची होस्टिंग आणि डोमेन नेम कुणाच्या नावावर नोंद केले आहे किंवा आयपी ॲड्रेसबाबत माहिती मिळविली जाऊ शकते. संबंधित वेबसाईटच्या मालकापर्यंत पोहोचणे सहज शक्य नसले तरी गुगलकडे तक्रार नोंदविल्यास सबंधित वेबसाईटवरून विशिष्ट मजकूर किंवा थेट साईटदेखील डाऊन करता येऊ शकते. सबंधित वेबसाईटची होस्टिंग परदेशात असल्यास मात्र मर्यादा येतात.
भयानकच! म्हणे, मॉडेल्सही मिळतील
‘सर्च इंजिन’वर ‘अमरावती फिमेल एस्कॉर्ट’ हा शब्द सर्च केला असता, त्याठिकाणी अनेक मुलींची बोल्ड छायाचित्र असलेल्या शेकडो जाहिराती दिसून येतात. या वेबसाईटवर जवळपास सर्व मोठ्या शहरांची नावे आहेत. अगदी मॉडेल्स आणि कॉलेजच्या मुली मिळतील, असा उल्लेखदेखील यात आहेत. एखाद्या पर्यटकाला किंवा अन्य कुणालाही शरीरशैय्या करण्यासाठी सर्च केल्यास संबंधित वेबसाईटच समोर येते. प्रत्येक वेबसाईटच्या लिंकवर वेगवेगळ्या मुली व महिलांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक वेबसाईटवर वेगवेगळी माहिती आणि मोबाईल नंबर दिले आहेत. मात्र, ते फोन नंबर किती खरे न किती खोटे, हे कळू शकले नाही.
एखाद्या मुलीची, महिलेची तक्रार आल्यास, ते प्रोफाईल डिलिट करण्यासंदर्भात संबंधित वेबसाईट वा सर्च इंजिनशी पत्रव्यवहार केला जातो. मात्र, अद्यापपर्यंत तरी अशी तक्रार सायबरकडे आलेली नाही.
- सीमा दाताळकर, ठाणेदार, सायबर पोलीस ठाणे