चुडामण नदीपात्रातील नवजात बाळाच्या मातेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:13 AM2021-04-02T04:13:48+5:302021-04-02T04:13:48+5:30
वरूड : स्थानिक चुडामण नदीमध्ये एक दिवसाच्या नवजाताला सोडून एका मातेने पलायन केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. ...
वरूड : स्थानिक चुडामण नदीमध्ये एक दिवसाच्या नवजाताला सोडून एका मातेने पलायन केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. वरूड पोलीस आता त्या मातेचा शोध घेण्याकरिता शहरातील खासगी दवाखान्यांतील नोंदी तपासत आहेत. त्यासंबंधी नोटीस रुग्णालयांना पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक केदारेश्वर मंदिराच्या बाजूला ताजनगर येथील चुडामण नदीकाठावर एका झुडपांमध्ये एक दिवसाचे पुरुष जातीचे नवजात आढळून आले होते. रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली. ठाणेदार प्रदीप चौगावकर, सहायक पोलीस निरीक्षक सारिका बागडे, संदीप वंजारी यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून सदर बालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. तेथून अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर बाळ फेकून देणारी ती अभागी माता कोण, याचा शोध घेण्याकरिता शहारातील सर्व खासगी रुग्णालयांची चौकशी सुरू असून, नोंदी तपासल्या जात आहेत. याबाबात नोटीस देण्यात आल्याचे तपास अधिकारी सारिका बागडे यांनी सांगितले.
शहरातील तपासणी झाल्यानंतर ग्रामीण भागातील दवाखाने आणि तालुक्यालगत असलेल्या गावांतील रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांत त्या निर्दयी मातेचं शोध लागलेला नाही. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाल्याची चर्चा आहे.
----