प्रवासी महिलांशी आॅटोचालकांची हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:05 PM2019-02-18T23:05:09+5:302019-02-18T23:05:31+5:30
सिटीबसने जाऊ इच्छिणाऱ्या महिलांशी काही आॅटोचालकांनी हुज्जत घालून एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील आॅटो थांब्यावर हा प्रकार घडला.
बडनेरा : सिटीबसने जाऊ इच्छिणाऱ्या महिलांशी काही आॅटोचालकांनी हुज्जत घालून एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील आॅटो थांब्यावर हा प्रकार घडला. आॅटोचालकांनी एका तरुणास मारहाण केल्याने बडनेरा शहारात तणाव निर्माण झाला. पाचशेपेक्षा अधिक तरुणांचा जमाव ठाण्यात आल्याने या तणावात भर पडली.
काही महिला प्रवासी स्थानकाबाहेर पडल्या. तेथील आॅटोचालकांनी त्यांना आॅटोबाबत विचारणा केली. मात्र आपण सिटीबसने जाणार असल्याचे त्या महिलांनी सांगितले. त्यावर काही आॅटोचालकांनी आॅटोस नकार देणाºया त्या महिलांशी चांगलीच हुज्जत घातली. त्यावेळी तेथे आपल्या काकुला घ्यायला आलेल्या राहुल शिवाजी जाधव (हरिदासपेठ, बडनेरा) याने आॅटोचालकांना हटकले असता, काही आॅटोचालकांनी त्याचेवर चाकू उगारून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. ही माहिती राहुलच्या मित्रांना मिळताच ते परिसरात आले. तोपर्यंत राहुलला मारहाण करणारे आॅटोचालक तेथून पसार झाले होते.
बडनेरा पोलीस ठाण्यात जमाव
राहुल जाधव याने सुरुवातीला बडनेरा पोलीस ठाणे गाठले. मात्र, घटनास्थळ आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत त्यास परत धाडण्यात आले. मात्र रेल्वे पोलिसांनीही हद्दीचा मुद्दा समोर करीत रेल्वे स्थानकाबाहेरचा परिसर बडनेरा पोलिसांकडे असल्याचे सांगितले. तूर्तास राहुल जाधव व पाचशेहून अधिक नागरिकांचा जमाव बडनेरा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आहे. रेल्वे मंडळाचे सदस्य सुनील भालेराव, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, किशोवर जाधव, नगरसेवक ललित झंझाळ व बंडू धामणे ही मंडळी उद्दाम आॅटोचालकांवर कडक कारवाईसाठी आग्रही आहेत.
नितीन मोहोडविरुद्ध रोष
आॅटो संघटनेचे नेता नितीन मोहोड हे सदानकदा आॅटोचालकांची भलामण करीत असतात, असा आरोप करून जाधव यांच्या समर्थनार्थ पोहोचलेल्या जमावाने मोहोड यांच्याविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला. नितीन मोहोड यांना आॅटोचालकांकडून प्रवाशांना होणाºया मारहाण वा त्रासाचे काहीएक देणेघेणे नसल्याचा आरोप करण्यात आला.