राष्ट्रीय लोक अदालतीत २,३७४ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:39+5:302021-09-27T04:13:39+5:30
यशस्वी तोडगा : न्यायालयाचा पुढाकार अमरावती : जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक ...
यशस्वी तोडगा : न्यायालयाचा पुढाकार
अमरावती : जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २,३७४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेचे प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याचे प्रकरणे (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट), भूसंपादन प्रकरणे, विवाहासंबंधी कायद्याचे दावे, बँकेचे तसेच दिवाणी आणि फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे संबंधित दाखलपूर्व प्रकरणेसुद्धा तडजोडीकरिता लोकअदालतीसमक्ष ठेवण्यात आली होती. लोक अदालतीमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण ३६ मंडळ (पॅनल)ची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायाधीश, अधिवक्ता गण तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचा समावेश होता. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित प्रस्तुत लोकअदालतीला भारी प्रतिसाद मिळाला असून जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातून एकूण २५,०२६ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १,१३८ प्रकरणांचा तर एकूण ९,२२९ प्रलंबित प्रकरणांपैकी १,२३६ प्रकरणे अशा एकूण २,३७४ प्रकरणांचा यशस्वीरीत्या निपटारा करण्यात आला. या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण ११ कोटी ४४ लाख ६५ हजार २०७ रुपये तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा झाला.
तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २२, २३ व २४ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत १,५९३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील इतर न्यायाधीश वर्ग, जिल्हा सरकारी वकील संघ तसेच जिल्हा वकील संघातील तज्ज्ञ वकील मंडळी यांच्या मार्गदर्शनात लोकअदालत यशस्वीरीत्या संपन्न झाली.