अमरावती: पांढरी खानमपूर येथे स्वागत कमानला नाव देण्यावरुन दोन समाजात वाद

By उज्वल भालेकर | Published: March 6, 2024 01:07 PM2024-03-06T13:07:47+5:302024-03-06T13:09:48+5:30

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती.

Dispute between two communities over naming Swagat Arch at Pandhari Khanampur | अमरावती: पांढरी खानमपूर येथे स्वागत कमानला नाव देण्यावरुन दोन समाजात वाद

अमरावती: पांढरी खानमपूर येथे स्वागत कमानला नाव देण्यावरुन दोन समाजात वाद

अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती. तसा ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतला होता. परंतु याला काही इतर समाजबांधवांनी विरोध दर्शविल्याने गावामध्ये दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बुधवारी गावातील दीडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी गाव सोडले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेता, मंगळवारी रात्रीपासूनच गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२० रोजी गावामध्ये प्रवेशद्वार उभारुन त्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता. परंतु याच कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन डॉ. प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असाही ठराव पारीत करण्यात आला होता. तसेच खानमपूर गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम करणे करिता कार्यकारी अभियंता राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग अकोला यांच्याकडूनही २२ फेब्रुवारी २०२४ ला प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त देण्यात आले होते. या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर मात्र गावातील काही समाजबांधवांकडून या प्रवेशद्वाराला विरोध करण्यात आला.

तसेच गावातील बौद्ध बांधवावर बहिष्कार टाकल्याची तक्रारही देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे गावातील दिडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी बुधवारी गाव सोडून मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारामुळे सामाजिक सलोखा कायम रहावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावामध्ये ८ मार्च पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलिसांचा गावामध्ये बंदोबस्त दिसून येत आहे. गाव सोडलेले शेकडो बांधव हे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर मार्गे अमरावतीमध्ये येऊन जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत, त्यानंतर येथून सर्व मुंबई मत्रालयाच्य दिशेने पुढील प्रवास सुरु करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Dispute between two communities over naming Swagat Arch at Pandhari Khanampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.