आमदार रवी राणा-भाजपमध्ये वाद पेटला; फलकावरील राणांच्या नावाला काळं फासत तोडफोड
By गणेश वासनिक | Published: April 25, 2023 12:37 PM2023-04-25T12:37:20+5:302023-04-25T12:43:45+5:30
भाजपा लोकप्रतिनिधीच्या विकासकामाचे श्रेय रवी राणा घेत असल्याचा आरोप
अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपच आता मैदानात उतरली असून भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी मंगळवारी साईनगरात लावलेल्या विकास कामाच्या फलकाला काळं फासलं असून त्यामुळे अमरावती शहराचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रभागातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते तुषार भारतीय करीत आहे.
तुषार भारतीय यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्र १९ साईनगर येथील सातुर्णा सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यासह जावून काळं फासलं. आमदार रवी राणांनी नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले. त्यांना दहा दिवसापूर्वीच अल्टीमीटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही पण त्यांनी काढले नाही त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका त्यांनी काढले नाही आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं आहे, असे तुषार भारतीय म्हणाले. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजान नागरीक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठलेही नगरसेवक असा प्रकार कदापी सहन करणार नाही, असे माजी महापौर चेतन गावंडे म्हणाले.