अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद; तीन तास रोखला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:01+5:302021-01-09T04:11:01+5:30
फोटो पी ०८ मौजखेडा फोल्डर परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरातून चांदूर बाजार मार्गावर पुनर्वसित झालेल्या मौजेखेडा ...
फोटो पी ०८ मौजखेडा फोल्डर
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरातून चांदूर बाजार मार्गावर पुनर्वसित झालेल्या मौजेखेडा येथे अंत्यसंस्कारासाठी दाखविलेल्या जागेवर अंत्यसंस्कार करू न देता दुसरी जागा दाखविल्याने संतप्त आदिवासींनी शुक्रवारी दुपारी अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह तीन तास रोखून ठेवला. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर स्मशानभूमीसाठी तब्बल तीन किमी अंतरावरील राखीव स्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिखलदरा तालुक्यातील पिली गावाचे पुनर्वसन चांदूर बाजार तालुक्यातील मासोद ग्रामपंचायत अंतर्गत परतवाडा-चांदूर बाजार मुख्य मार्गालगत करण्यात आले आहे. पुनर्वसित पिली मौजेखेडा येथील अशोक हिरालाल जामूनकर (२७) याचा दुचाकी व ट्रक अपघातात गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. शुक्रवारी त्याच्या अंत्यविधीसाठी आधी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी गावानजीक स्मशानभूमीची जागा दाखविली होती. मात्र, ऐनवेळेवर पुनर्वसित गावाची स्मशानभूमी तीन किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आदिवासी संतप्त झाले. पूर्वी दाखवलेल्या व गावानजीक असलेल्या जागेवरच अंत्यसंस्कार करू, या मागणीवर आदिवासी ठाम होते. प्रत्यक्षात आदिवासी दावा करीत असलेली जागा कृषिकार्यासाठी पूर्वीपासून राखीव असल्याचे व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदन झाल्यावर शुक्रवारी दुपारी १ वाजता मृतदेह गावात पोहोचला. मात्र, तणाव निवळेना. अखेर तीन तासांनंतर दुपारी ४ वाजता तीन किमी अंतरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोट
पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान, व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पुनर्वसित गावानजीक अंत्यसंस्काराची जागा दाखविली होती. आता तीन किलोमीटर दूर असल्याचे सांगितले गेले. आमची फसवणूक करण्यात आली.
- राजू जामूनकर, पुनर्वसित आदिवासी, मौजेखेडा (पिली)
कोट
सदर गावाशेजारची जागा कृषिकार्यासाठी आरक्षित आहे. अंत्यसंस्कारासाठी दुसरी ई-क्लास जागा दाखविण्यात आली होती. उद्भवलेला वाद शमल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- कमलेश पाटील, सहायक वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा