२५ गावांचा खंडित वीजपुरवठा अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:33+5:302021-09-10T04:18:33+5:30
अमरावती : पावसामुळे महावितरण अकोली- भातकुली ही ३३ केव्ही वीज वाहिनी ब्रेकडाऊनमध्ये गेली होती. बॅक फिडींगच्या पर्याय ...
अमरावती : पावसामुळे महावितरण अकोली- भातकुली ही ३३ केव्ही वीज वाहिनी ब्रेकडाऊनमध्ये गेली होती. बॅक फिडींगच्या पर्याय असलेली भातकुली खोलापूर ३३ केव्ही वाहिनीही ब्रेकडाऊनमध्ये गेल्याने ३३ केव्ही भातकुली उपकेंद्र हे संपूर्णत: अंधारात होते. अशा बिकट परिस्थितीतही नॉन स्टॉप वर्किंगमुळे अखेर २५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
अकोली भातकुली वाहिनीवरील १७ आणि भातकुली खोलापूर-दर्यापूर वाहिनीवरील ५ असे एकूण २३ इन्सुलेटर बदलविण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून ३३ केव्ही वीज वाहिनीवरून भातकुली उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान अकोली उपकेंद्रातून अनेकवेळा लाईन चार्ज करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतू नवीन - नवीन इन्सुलेटरचे फॉल्ट मिळत असल्याने ३३ केव्ही अकोली - भातकुली वीज वाहिनीचा वीजपुरवठा पूर्ववत होण्यात अडथळा निर्माण होत असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा केल्यानंतर या वाहिनीच्या दुरुस्ती कामाला गती आली.
बॉक्स : शहरातील अनेक भागात तातडीने दुरुस्ती
काल संध्याकाळी मुसळधार पावसामुळे कोंडेश्वर ते वडाळी आणि पॉवर हाऊस ते विद्युत भवन या ३३ केव्ही वीज वाहिनीवर फॉल्ट आल्याने ३३ केव्ही विद्युत भवन,३३ केव्ही वडाळी आणि ३३ केव्ही कॉंग्रेसनगर या उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसाचा जोर आणि अंधार रात्र यामुळे फॉल्ट शोधण्यात महावितरणला अडथळा आला. अधिकाऱ्यांच्या पथकाकडून भर पावसात फुटलेले इन्सुलेटर बदलविण्यात आले. तसेच नांदगाव खंडेश्वर येथील वीजपुरवठा सुरळीत केला.