रीडिंगला अडथळा; १० हजार ग्राहकांना अंदाजपंचे वीजबिल

By उज्वल भालेकर | Published: February 10, 2024 09:43 PM2024-02-10T21:43:57+5:302024-02-10T21:44:21+5:30

अचूक बिलासाठी ग्राहक महावितरणच्या ॲपद्वारे भरू शकतात मीटर रीडिंग

Disruption of reading; Estimated electricity bill for 10,000 customers in amravati | रीडिंगला अडथळा; १० हजार ग्राहकांना अंदाजपंचे वीजबिल

रीडिंगला अडथळा; १० हजार ग्राहकांना अंदाजपंचे वीजबिल

अमरावती : प्रत्येक ग्राहकांना त्यांनी वापर केलेल्या विजेच्या प्रमाणातच बिल मिळणे गरजेचे आहे; परंतु अमरावती परिमंडळातील १० हजार २८५ ग्राहकांचे मीटर रीडिंग करण्यास महावितरणला अडथळा येत असल्याने या ग्राहकांना सरासरी पद्धतीने अंदाजे वीजबिल आकारण्यात येत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी अचूक बिलासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मीटर रीडिंग घेता येईल, अशा ठिकाणी मीटर बसविण्याचे किंवा मग ग्राहकांनी स्वत:च महावितरणच्या मोबाइल ॲपवर मीटर रीडिंग भरण्याचे आवाहन महावितरणे केले आहे.

महावितरणच्या अमरावती परिमंडळामध्ये अमरावती आणि यवतमाळ अशा दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांतील दहा महिन्यांत मीटर रीडिंग न झालेल्या ३५ हजार ग्राहकांपैकी २४ हजार ७४४ ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यास महावितरणला यश आले आहे; परंतु अजूनही १० हजार २८५ ग्राहकांचे घर बंद राहत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मीटरचे रीडिंग घेता आलेले नाही; परंतु प्रत्येक ग्राहकाला अचूक वीजबिल मिळावे, यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी हे आग्रही आहेत. महावितरणकडून दर महिन्याला वीज ग्राहकांच्या वीज मीटरचे वाचन करून त्यांना वीजबिल आकारले जाते; परंतु ज्या ग्राहकांच्या मीटरचे वाचन करता आलेले नाही त्यांना सरासरी पद्धतीने अंदाजे वीजबिल देत आहेत. त्यामुळे हे चित्र थांबविण्यासाठी ग्राहकांनी आपले वीज मीटर हे वीज कर्मचाऱ्याला रीडिंग घेता येईल, अशा ठिकाणी लावण्याचे किंवा ग्राहकांनी स्वत:च्या मीटरचे रीडिंग महावितरणच्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून पाठविण्याची सुविधादेखील महावितरणने उपलब्ध करून दिली असून, याचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजचोरी आढळल्यास होणार कारवाई
ज्या ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्यास महावितरण कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे, अशा सर्वच ग्राहकांचे मीटर तपासण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. त्यामुळे जर यामध्ये वीजचोरीचा प्रकार आढळल्यास संबंधित ग्राहकावर विद्युत कायदा २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियादेखील राबविण्यात येणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

Web Title: Disruption of reading; Estimated electricity bill for 10,000 customers in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.