दर्यापुरात पुस्तके वाटपात घोळ
By admin | Published: June 16, 2017 12:04 AM2017-06-16T00:04:02+5:302017-06-16T00:04:02+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ते ८ वीपर्यंत मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात येत आहे.
शिक्षकच नेताहेत पुस्तके : गटसमन्वयकांचे दुर्लक्ष
सचिन मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ते ८ वीपर्यंत मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंत किंवा केंद्रापर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा नियम असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून येथील एका शाळेतूनच तालुक्यात पुस्तके वाटप करण्यात येत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खुद शिक्षकच पुस्तके त्यांच्या दुचाकीवर घेऊन जात आहेत.
सर्वशिक्षा अभियांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३२ शाळा आहेत. तसेच नगर परिषदेच्या १३ शाळा व खासगी आणि अनुदानित शाळांना हे पुस्तकांचे वाटप दर्यापूर पंचायत समितीच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत करण्यात येत आहे. याकरीता डॉ.जाकीर हुसेन नगर परिषद उर्दू प्राथमिक मुलींची शाळा क्रमांक ४ येथे शिक्षण विभागाच्यावतीने आलेले पुस्तके ठेवण्यात आलेले आहेत. नियमानुसार सदर पुस्तके सर्कलनिहाय सर्वशिक्षा विभागाच्या केंद्रावर व तेथून तालुक्यातील विविध शाळांवर वाहनाने पोहोचविणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिक्षण विभागाच्यावतीने पैसेसुध्दा मिळतात. त्याचे व्हॉऊचरदेखील काढण्यात येतात. पण येथील गटसमन्वयकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामीण भागातील शाळांच्या मुख्याध्यापकांना व शिक्षकांना दर्यापूर येथून आपल्या खासगी वाहनांवर पुस्तके घेऊन जाण्याचा नवा जावईशोध लावला. याला शिक्षकही बळी पडले आहेत. काही शिक्षकांनी मंगळवारी दुपारी काही पुस्तके नेले. पण "लोकमत"चे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचल्यामुळे हा सर्व सावरागोंधळ उघड झाला. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी प्रकाश घाटे यांनी नियमानुसार संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या पुस्तके वाटप करण्यात आलेले नाही. केंद्राकेंद्रांत पुस्तके ठेवण्यासाठी शिक्षकांना बोलावले होते, असे मला गटसमन्वयकांनी सांगितले. तसा वरिष्ठांना अहवालही पाठविला आहे.
- प्रकाश घाटे,
गटशिक्षाधिकारी,
पंचायत समिती दर्यापूर