दुष्काळनिधी सर्व तालुक्यांना वितरित
By admin | Published: February 5, 2015 11:00 PM2015-02-05T23:00:29+5:302015-02-05T23:00:29+5:30
जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती, ४६ पैसे पैसेवारी खरिपासह रबीवर नापीकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून ४ फेब्रुवारीला प्राप्त दुसऱ्या टप्प्याचा १२५ कोटी ८४ लाखांचा
अमरावती : जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती, ४६ पैसे पैसेवारी खरिपासह रबीवर नापीकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून ४ फेब्रुवारीला प्राप्त दुसऱ्या टप्प्याचा १२५ कोटी ८४ लाखांचा मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तालुक्यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (बीडीएस) गुरुवार ५ फेब्रुवारीला वितरित केला.
खरीप २१४ मध्ये १४ तालुक्यामधील १९८१ गावामधील ४ लाख ४३ हजार ९७४ असा अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या शेती व फळपीकाचे नुकसान झाले. त्यानूसार ८ जानेवारी पहिल्या टप्यातील ४० टक्के १२५ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला तर ५ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील ४० टक्के १२५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपर्यंत ८३ टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कित्येक शेतकऱ्यांना हा निधी अद्यापपर्यंत मिळालेला नाही.
दुसऱ्या टप्यात अमरावती तालुक्यात ७ कोटी ५० लाख, भातकुली तालुक्याला ६ कोटी २५ लाख, तिवसा तालुक्याला ६ कोटी ७५ लाख, चांदूररेल्वे ६ कोटी, धामणगांव तालुक्यात ७ कोटी ५० लाख नांदगांव खंडेश्वर तालुक्यात ८ कोटी ७५ लाख, दर्यापूर तालुक्याला ८ कोटी, अंजनगाव सुर्जी तालुक्याला ९ कोटी ५० लाख, अचलपूर तालुक्याला १९ कोटी ५० लाख, चांदूर बाजार- १२ कोटी ७५ लाख, मोर्शी - १२ कोटी ५० लाख, वरुड- १३ कोटी ७५ लाख, धारणी- ५ कोटी ७५ लाख, चिखलदरा- १ कोटी ९ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.