पोषण आहारात विद्यार्थ्यांना बुरशीजन्य चिक्कीचे वाटप; खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 02:39 PM2022-07-28T14:39:10+5:302022-07-29T16:52:24+5:30
पालकाच्या आक्षेपानंतर शाळेने वाटप थांबविले
अमरावती : शहरातील एका खासगी शाळेतील पोषण आहारामध्ये चक्क बुरशीजन्य तिळाची चिक्की देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. एका पालकाच्या तक्रारीवरून हा प्रकार एका शिक्षकाने लक्षात आणून दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी चिक्कीचे वाटप थांबविले. या प्रकरणाची चौकशी करून पुरवठा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.
केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त आहार दिला जातो. या अंतर्गत महानगरपालिकेतही केंद्रीय कुकिंग पद्धती सुरू झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरातील शाळांना दर बुधवारी पूरक पोषण आहार पुरविण्यात येतो. शहरातील एका खासगी शाळेत बुधवारी सकाळच्या सत्रात पोषण आहारामध्ये तिळाच्या चिक्कीचे वाटप करण्यात आले. परंतु, ही चिक्की बुरशीजन्य असल्याचे एका पालकाच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ही बाब एका शिक्षकाच्या लक्षात आणून देताच शाळा व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली. महानगरपालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी अब्दुल राझिक यांनी शाळेत येऊन चिक्कीची पाहणी केली असता, त्यात बुरशी आढळली नसल्याचे राझिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आपण स्वत: चिक्की खाऊन बघितल्याचेही ते म्हणाले. असे असले तरी ‘लोकमत’च्या चमूने स्वत: हा प्रकार बघितला. त्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले.