सणासुदीत रेशनमध्ये गव्हाऐवजी ज्वारी तीन महिन्यांपर्यंत वाटप; ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांत नाराजीचा सूर
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 23, 2024 10:01 PM2024-08-23T22:01:28+5:302024-08-23T22:01:46+5:30
जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेद्वारे नऊ तालुक्यांतील खरेदी-विक्री संघाद्वारे ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे.
अमरावती : सण-उत्सवांच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थींना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप झाले. आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे. राज्याच्या पुरवठा विभागाने तसे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेद्वारे नऊ तालुक्यांतील खरेदी-विक्री संघाद्वारे ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९,५३८ क्विंटल रब्बी ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे व ही ज्वारी आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय व प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. तसे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारा देण्यात आलेले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून गव्हाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे व त्याऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे.