क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त शाळांना अनुदान वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:36 AM2017-08-31T00:36:33+5:302017-08-31T00:36:52+5:30
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त शाळांचा सन्मान तथा अनुदान वितरित करण्यात आले.
येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक प्रतिभा देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, प्रमोद चांदूरकर, नितीन चव्हाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विविध खेळ प्रकारात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी करणाºया शाळांना सन्मानित करण्यात आले. यात १४ वर्ष वयोगटात प्रथम बक्षीस म्हणून तोमेय इंग्लिश स्कुलला एक लाख, द्वितीय बक्षीस ज्ञानमाता हायस्कुल ७५ हजार रुपये तर तृतीय बक्षीस स्कुल आॅफ स्कॉलर्स यांना ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच १७ वर्ष वयोगटासाठी ज्ञानमाता हायस्कुल यांना प्रथम बक्षीस म्हणून एक लाख, स्कुल आॅफ स्कालर्स यांना द्वितीय बक्षीस ७५ हजार रुपये तर तोमेय इंग्लिश प्रायमरी स्कुल तृतीय बक्षीस ५० हजार रुपयांचे धनादेश बहाल करण्यात आले. १९ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय एक लाख रुपये, द्वितीय क्रमांक रामकृष्ण क्रीडा विद्यालय ७५ हजार तर तृतीय क्रमांक विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था ५० हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्राविण्यप्राप्त १०० खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन बी.एन. महानकर यांनी केले.
राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सायन्स स्कोर मैदानावर फुटबॉलचे सामने, विभागीय क्रीडा संकुलात हॉकी खेळाचे प्रदर्शनिय सामने, नेटबॉल खेळाचे सामने, इंडो पब्लिक स्कुल येथे क्रीडा साहित्याची प्रदर्शनी, मॅराथॉन स्पर्धा तर महानगर शारीरिक शिक्षक संघटनेच्यावतीने क्रीडा, खेळांचा प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली.