घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:31 AM2023-05-24T11:31:02+5:302023-05-24T11:33:58+5:30

‘लोकमत’च्या स्टिंगनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, जागोजागी तपासणी

District administration on action mode after 'Lokmat' sting, Reti Ghat deserted, thieves underground, Tehsildar's spot visit | घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

googlenewsNext

अमरावती : एकाही घाटाचा लिलाव झालेला नसताना रेती चोरीसाठी खुलेआम होत असलेली नदीपात्राची चाळण मंगळवारी (तात्पुरती) पूर्णत: थांबली. घाट निर्मनुष्य, रेती चोरटे गायब होते. याशिवाय महसूल पथकांद्वारा जागोजागी वाहनांची तपासणी व संबंधित तहसीलदार यांच्याद्वारा घाटांची पाहणी करण्यात येत असल्याचे चित्र बहुतांश तालुक्यात दिसून आले. जिल्ह्यातील घाटांमधून खुलेआम वाळूचीतस्करी होत असल्याबाबतचा ‘लोकमत’ चमूचा सचित्र ग्राउंड रिपोर्ट मंगळवारचे ‘अंकात प्रसिद्ध होताच वाळू तस्करांचे धाबे दणाणले. प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी ॲक्शन मोडवर येत संबंधित तहसीलदारांना तत्काळ पाहणीचे व पथक सक्रिय करण्याचे आदेश दिले.

नदीपात्रात गस्त, वाहनांची तपासणी

परतवाडा : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली. नव्याने रुजू झालेल्या तहसीलदारांनी यापूर्वी गठित पथकांना रिचार्ज केले. वाहनांसह नदीपात्रातही रात्रंदिवस नेमून दिलेल्या वेळेनुसार गस्तीचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे रेती चोरट्यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचा हवाला देत ‘देखो रे जरा संभल के कुछ दिन’ चा संदेश मोबाइलद्वारे दिल्याची माहिती आहे. ‘महसूल’चे पथक रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनांची तपासणी शहरात येणाऱ्या रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर करताना दिसून आले.

गठित पथकाद्वारे ग्रस्त व तपासणी करून गौण खनिज चोरट्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे.

- संजयकुमार गरकल, तहसीलदार, अचलपूर

वरूड तहसीलदारांनी केली घाटाची पाहणी

वरूड : रात्रीच्या काळोखात रेतीची तस्करी करून ट्रॅक्टरने नियोजित ठिकाणी पोहोचविल्या जाते. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे वृत्त प्रकाशित होताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. थेट तहसीलदार पंकज चव्हाण यांच्यासह तलाठ्यांचे पथक रेती घाटावर पोहोचले. येथे होत असलेल्या रेती तस्करीवर कारवाई व साठवलेले ढीग जप्त करण्याचे व पथकाला रात्रीदेखील ग्रस्त करण्याचे आदेश दिले. यावेळी मंडळ अधिकारी प्रमोद सोळंके यांच्यासह तलाठी उपस्थित होते.

तहसीलदार स्वतः उतरले मैदानावर

धारणी : दिवसाढवळ्या रेती उपसा करून रात्री अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच स्वतः तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी दोन नायब तहसीलदार यांच्यासोबत मंगळवारी सकाळी चिंचघाट या तापी नदीच्या पात्राची पाहणी केली. त्यांनी आपल्या अधीनस्त तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नदी-नाल्यांची तत्काळ पाहणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

ट्रॅक्टर पकडला वाळूचा, हजर केला तर विटांची राख.

तिवसा - महसूल प्रशासनाने सोमवारी दुपारी कौंडण्यपूरजवळ वाळूचा टॅक्टर पकडला व कारवाई न करता सोडला. याप्रकरणी तडजोड झाल्याचा संशय आल्याने येथील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे प्रशासनाने चालकाला टॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यासाठी सूचना केली. तहसीलमध्ये येताच यामध्ये वाळूने भरलेल्या टॅक्टरमध्ये विटांची राख दाखविण्यात आल्याने कारवाई न करता टॅक्टर सोडून देण्यात आला. विशेष म्हणजे हा टॅक्टर पकडताना घटनास्थळी दोन तलाठी हजर होते. या चमत्काराबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान मंगळवारच्या अंकात वाळू तस्करीची बातमी प्रसिद्ध होताच महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. तहसीलदारांनी याविषयी अधीनस्त यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले.

दिवसभर कार्यालयीन कामकाज आटोपून महसूल पथक रात्रभर अवैध वाळू वाहतुकीच्या मागावर असतो. पथकाची चाहूल लागताच वाळू वाहतुकीचा मोर्चा अन्य मार्गाने वळविण्यात येतो.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा.

जिल्हास्तरीय तीन पथके, दोन दिवसांत अहवाल 

‘लोकमत’मधील स्टिंगनंतर प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय तीन पथकांचे गठन करण्याचे निर्देश दिले व या पथकांनी सर्व घाटांची पाहणी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सीपी, एसपी व आरटीओ विभागाला मनुष्यबळ व सुरक्षा पुरविण्यासाठी पत्र दिले आहे. सर्व तहसीलदारांना पत्र देऊन महसूल पथके ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: District administration on action mode after 'Lokmat' sting, Reti Ghat deserted, thieves underground, Tehsildar's spot visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.