जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:27 AM2018-09-13T01:27:47+5:302018-09-13T01:28:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा बँकेच्या मोबाइल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून खातेदारांसोबतच इतरही बँकांच्या एटीएम कार्डधारकांना रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा बुधवारपासून शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता उपलब्ध करण्यात आली. विशेष म्हणजे एटीएम सुविधेनंतर आता बँकेने मोबाईल व्हॅन सेवेत आणली आहे.
जिल्हा बँकेने वितरित केलेले रूपे कार्ड व एटीएम डेबिट कार्डचा एटीएम व्हॅनच्या माध्यमातून उपयोग करून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना सुविधेचा लाभ मिळणार आहे. मोबाइल व्हॅन अत्याधुनिक असून, या माध्यमातून नाबार्डच्या सहकार्याने जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी पोहोचणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याला बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, बंडू देशमुख, प्रवीण काशीकर, सुभाष पावडे, रवींंद्र गायगोले, प्रदीप निमकर, दयाराम काळे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी राठोड, वरिष्ठ अधिकारी एस.बी. चांदूरकर, महेंद्र देशमुख, चंद्रकांत निर्मळ, दिलीप कोहळे आदी उपस्थित होते.
शेतकरी हा बँकेचा केंद्रबिंदू मानून बँकेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. शेतकरी व बँकेच्या विकासाचे ध्येय ठेवून संचालक मंडळाची वाटचाल सुरू आहे. ज्या गावात बँकेची सोय नाही, त्या शेतकरी व नागरिकांच्या दारापर्यंत मोबाईल एटीएम व्हॅनद्वारे सुविधा पुरवेन.
- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक