जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना कर्ज नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:15 AM2021-04-23T04:15:19+5:302021-04-23T04:15:19+5:30
वरूड : तोट्यातली शेती करूनही दरवर्षी कृषी कर्ज नियमित भरत आलेल्या शेतकऱ्यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरूड शाखेने ...
वरूड : तोट्यातली शेती करूनही दरवर्षी कृषी कर्ज नियमित भरत आलेल्या शेतकऱ्यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरूड शाखेने कृषी कर्ज नाकारल्याने वघाळ सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
३१ मार्चच्या आत कृषी कर्ज भरायचे व पुन्हा नव्या शेती हंगामासाठी कर्ज उचलायचे. या बळावर आजतागायत शेती कसणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांना वरूडच्या बँक अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.
वघाळ येथे उपसा जलसिंचन योजना असून असंख्य शेतकऱ्यांनी शेतजमिनी गहाण ठेवून ४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. वर्धा नदीवरील झुंज धबधब्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर या योजनेंतर्गत सिंचन सुरू आहे. या योजनेच्या बळावर वघाळ संत्रा मोसंबी बागांनी बहरलेले एक गाव आहे.
गेल्या तीन दशकांपासून ही उपसा जलसिंचन योजना असून आर्थिक संकटात सापडलेल्या इथल्या शेतकऱ्यांवर थकबाकी आहे. अनेकवेळा शासनाकडे उपसा जलसिंचन योजनेच्या कर्ज माफीबाबत पाठपुरावा केला. उपसा जलसिंचन योजनेच्या थकबाकीचा व अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कृषी कर्जाचा परस्पर संबंध नसताना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कृषी कर्ज मंजुरी अधिकाऱ्याने नवीन अट घालणे म्हणजे आश्चर्यच. यंदा कृषीकर्ज मंजुरी अधिकाऱ्याने वघाळच्या शेतकऱ्यांपुढे उपसा जलसिंचन योजनेची थकबाकी भरा, अन्यथा कृषीकर्ज नाही, असा अजब निर्वाळा दिला. शेतकरीहीत जोपासणारे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.