‘पोकरा’च्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:28+5:302021-09-27T04:13:28+5:30
अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील (पोकरा) विविध उपक्रमांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ...
अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील (पोकरा) विविध उपक्रमांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शुक्रवारी दिले.
पोकरा योजनेची अंमलबजावणी, तसेच विविध विकास आराखड्यातील कामांची पाहणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आसेगाव, पुसदा, मासोद, रिद्धपूर आदी विविध गावांना भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह अधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.
आसेगाव पूर्णा येथील कृषी सहयोग शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. याठिकाणी डाळ उद्योगासाठी ‘पोकरा’च्या माध्यमातून आवश्यक अद्ययावत यंत्रणा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगाला बळ मिळाले आहे. त्यानुसार उद्योगाचे ‘बिझनेस मॉडेल’ म्हणून सादरीकरण करण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. पुसदा येथील महिला बचत गटांच्या अवजार बँकेचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. मासोद व चिटुकले येथेही त्यांनी भेट दिली व संत्राबाग, जरबेरा लागवड आदींची पाहणी केली. शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पिकेल ते विकेल अभियान सर्वदूर राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. रिद्धपूर विकास आराखड्यातील कामांची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात केली. नियोजनानुसार सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.