रुग्णांच्या सुविधेकरिता जिल्हा काँग्रेसची हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:43+5:302021-05-12T04:13:43+5:30
अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागातील परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बिकट झालेली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त ...
अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागातील परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बिकट झालेली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रुग्णांच्या सुविधेकरिता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडूनदेखील जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका स्तरावर महारक्तदान शिबिरे घेण्यात आले आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासन व प्रशासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. शेतकऱ्यांना शेतमजुरांना व सर्व घटकांना त्रास होऊ नये याकरिता शासनाकडून ऑटोरिक्षाधारक, बांधकाम कामगार, मोफत रेशन अशा विविध योजना सध्या शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू आहे. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खतांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नका, घरात राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे. नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी गर्दी न करता प्रशासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे लसीकरून करून घ्यावे, असे आवाहन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
बॉक्स
झेडपी, पंचायत समितीची कामे ऑनलाईन करा
कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची कामे सध्या बंद ठेवली असली तरी या स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित कामे करण्यासाठी नागरिकांना जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जाण्याची गरज नसून ऑनलाइन कामांवर भर द्यावा, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी राहूनच आपल्या अडीअडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे.
बॉक्स
कॉंग्रेसचा कोरोना साहाय्यता कक्ष
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची गैरसोय होऊ नये अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून जाण्याकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना साहाय्यता कक्ष स्थापन केला आहे. याकरिता हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले असून कोणत्याही रुग्णांना तसेच नातेवाइकांनी ९४२३६२१८७७, ९४२३१२४४६८, ७५८८५४५५८९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन बबलू देशमुख यांनी केले आहे.