केंद्र, राज्य शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: October 28, 2015 12:29 AM2015-10-28T00:29:50+5:302015-10-28T00:29:50+5:30
केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे.
आंदोलन : जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीचा निषेध
अमरावती : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे डाळीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि वाढते भारनियमन बंद करून अखंडित वीजपुरवठा करावा यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा सरकार विरोधात निदर्शने केलीत. वाढलेली महागाई आटोक्यात आणून शासकीय स्वस्तधान्य दुकानातून माफक दरात डाळीचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत येताच एका वर्षातच गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावून बड्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
योजना केवळ गरीब व सर्वसामान्यांसाठी राबवीत असल्याचा देखावा करून गरिबांना जीवनावश्यक वस्तूमध्ये मध्ये एका वर्षातच अव्याढव्य भाववाढ केल्याचे वास्तव आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट सर्वश्रृत आहे. असे असतानाच ट्रॉन्सफार्मर जळण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होत आहे. ही विदारक स्थितीत भाजपा सरकारमुळे ओढवल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेसने केला आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्यानिमित्त स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात डाळींचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदनाव्दारे केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, गिरीश कराळे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर, दीपा लेंडे, ज्योती आरेकर, रजंना उईके, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, प्रवीण घुईखेडकर, बापुराव गायकवाड, महेंद्रसिंग गैलवार, विलास पवार, सुधाकर भारसाकळे, प्रमोद दाळू, सुरेश आळे, भानुदास चोपडे, भागवत खांडे, र्कैलास आवारे, श्रीराम नेहर, संजय वानखडे, हिरालाल मावस्कर, अवधूत हरणे, बिटू मगरोळे, वसंत देशमुख संजय मापले, प्रदीप देशमुख, बबलू बोबडे, राजू कुरेशी, गजानन पुरी, किशोर देशमुख, बंडू देशमुख, दयाराम काळे, हेमंत येवले व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)