जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिले मातेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:12 PM2017-10-25T23:12:11+5:302017-10-25T23:12:21+5:30
दुसºया बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने प्राणाशी गाठ आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसी युनिटने जीवदान देण्यासोबतच तिच्या तीन चिमुकल्यांवर मातृत्वाची सावली कायम ठेवली.
धीरेंद्र चाकोलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुसºया बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने प्राणाशी गाठ आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसी युनिटने जीवदान देण्यासोबतच तिच्या तीन चिमुकल्यांवर मातृत्वाची सावली कायम ठेवली. त्यामुळे सामान्यजनांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विश्वास दृढ झाला.
शहरातील विलासनगर येथील रोशनी पंकज सूर्यवंशी (२५) असे या महिलेचे नाव आहे. तिचा पती पंकज सूर्यवंशी यांचा याच परिसरात वेल्डिंगचा व्यवसाय आहे. या दाम्पत्याला अडीच वर्षांची जुळी मुले आहेत. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तिचे सिझेरियन करावे लागले. तिला बुधवार, १८ आॅक्टोबर रोजी दुसºया बाळंतपणासाठी गर्भ साडेआठ महिन्यांचाच असताना जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवतीची अवघडलेली स्थिती पाहून तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी तिचे सिझेरियन करण्याचे ठरविले. प्रसूतीदरम्यान गर्भाशयाला प्लासेंटा अॅक्रेटा चिकटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पुढील धोका टाळण्यासाठी हिस्टेरेक्टरी इमर्जंसी अर्थात गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. संध्या खराते व त्यांचे सहायक डॉ. परमार यांनी केली. यादरम्यान रक्तचाप कमी होत नसल्याचे पाहून रोशनीला इर्विन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी प्रीती मोरे यांच्याशी संपर्क करण्यात आला.
रोशनीला रक्तपुरवठा सुरू असल्याच्या अवस्थेतच सायंकाळी ५ वाजता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर आवश्यक रक्तपुरवठा करण्यात आला तसेच रक्तचाप सामान्य पातळीवर आणण्यासाठी उपचार करण्यात आले. स्त्रीरोगतज्ज्ञ काळपांडे, डॉ. पचगाडे यांनी हे उपचार केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोरे यांच्या नेतृत्वातील आयसीयू स्टाफने मोर्चा सांभाळला. अत्यंत नाजूक स्थितीतून रोशनीला काढल्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर आहे.
बाळ नागपूरला दाखल
रोशनीचे सिझेरियन करण्यात आले. तिने मुलीला जन्म दिला. प्रकृती नाजूक असल्याने तिला नागपूरच्या जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सामान्य माणसे शासकीय रुग्णसेवेबाबत नाके मुरडतात. मात्र, आमची सेवा उत्कृष्ट असल्याचे रोशनीच्या प्रकरणातून आम्ही दाखवून दिले आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक