जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:15 PM2019-08-05T22:15:11+5:302019-08-05T22:16:07+5:30
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार निवेदने, आंदोलन करण्यात आले. मात्र, अद्याप त्या प्रलंबित असल्याने सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन छेडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार निवेदने, आंदोलन करण्यात आले. मात्र, अद्याप त्या प्रलंबित असल्याने सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन छेडण्यात आले.
जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १५ ते २५ तारखेला होत असल्याने बँक कर्जाची परतफेड, पाल्यांचे शैक्षणिक खर्च, आजारपण आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने आरोग्य अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने वारंवार प्रशासनाला निवेदने दिली, आंदोलनसुद्धा केले. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव सोमवारी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाºयांनी प्रवेशद्वारासमोर सोमवारी सकाळी ११ पासून आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी १ वाजता शिष्टमंडळाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकाºयांना गेलेल्या शिष्टमंडळाला ते भेटले नसल्याने खुर्चीला निवेदन चिटकवण्यात आले. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांच्याशी झालेल्या चर्चेअंती केवळ वेतन वेळेत काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रवासभत्त्याचे काय, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला असता, त्यालंबंधी वरिष्ठांचे पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे, विनोद डोंगरे, बाबूलाल शिरसाट, रजनीकांत श्रीवास्तव, सुभाष चौहान, दीपक खंडाते, विनोद पारोदे, गोकुल बांबल, राजेश पणजकर, अशोक बडोदे, राजू मेश्राम, रामराव पवार, भगवंत शहाकार, पी.एस. तीनखेडे, शालिनी भाकरे, पुरुषोत्तम कुंबलवार, गोपाल ठोसर, प्रकाश राठोड, सुरेंद्र इंगळे, अतुल वानखडे आदी उपस्थित होते.