जिल्हास्तरीय अमृत कलश मुंबईला रवाना, जिल्हा परिषद : १४ तालुक्याचा सहभाग
By जितेंद्र दखने | Published: October 25, 2023 07:58 PM2023-10-25T19:58:27+5:302023-10-25T20:00:31+5:30
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप ३१ ऑक्टोबर दिल्ली होणार आहे.
अमरावती: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा ' उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. यात जिल्ह्यात प्रत्येक गावातून संकलित केलेल्या १४ तालुक्यातील मातीचे १४ माती कलश मुख्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करुन मुंबई व तेथून दिल्लीला रवाना करण्यात आला.बुधवारी या अनुषंगाने जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचेही आयोजन केले होते.
१ सप्टेंबर पासून जिल्ह्यात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायत मधील १ हजार ५६६ गावांमधून माती गोळा करुन तालुकास्तरावर माती कलश तयार केले. तालुक्यावर संकलित केलेले मातीचे अमृत कलश मुंबईला होणाऱ्या राज्यस्तरीय पाठविण्यासाठी २५ ऑक्टोंबरला जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार प्रताप अडसड यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ अविश्यांत पंडा, विकास उपायुक्त राजीव खडके, ॲडिशनल सीईओ संतोष जोशी, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, डेप्युटी सीईओ गिरीष धायगुडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, डेप्युटी श्रीराम कुळकर्णी, कैलास घोडके,कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड,सुनिल जाधव,बीडीओ, स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलश जिल्हास्तरावर संकलन करणे, वाजत गाजत अमृत कलश यात्रा काढून मुंबईसाठी रवाना करणे आदी उपक्रमाचा समावेश होता.
शुक्रवारी पोहोचणार मुंबईत
१४ तालुक्यातील १४ माती कलश घेऊन २८ स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक मुंबईसाठी रवाना झाले. जिल्हा समन्वयक, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर असून २८ स्वयंसेवक हे नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी आहेत. शुक्रवार,२७ ऑक्टोबरला मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्याच दिवशी ४ ते ६ वाजेदरम्यान राज्यातील सर्व स्वयंसेवक कलश घेऊन विशेष रेल्वेने दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप ३१ ऑक्टोबर दिल्ली होणार आहे.