वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी जिल्हास्तरीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:58+5:302021-05-12T04:13:58+5:30
अमरावती : पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गावांतील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही बाब भूषणावह ...
अमरावती : पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गावांतील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही बाब भूषणावह नाही. गावागावात सलोख्याचे संबंध, तसेच सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी अशा गाव, वाड्या, वस्त्यांची नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामविकास व सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर समिती गठित केली आहे.
या समितीमध्ये राज्यस्तरीय, विभागीय, तसेच जिल्हास्तरावर समितीचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे. ही समिती गाव स्तरावरील जातीवाचक वाड्या, वस्त्या, रस्त्यांची नावे बदलण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासंदर्भातील अहवाल शासनाला पाठविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा वाड्या, वस्त्यांची नावे लवकरच बदलणार असून, गावागावात एकात्मतेची, तसेच सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावात सलोखा निर्माण होणार आहे.
बॉक्स
महापुरुषांची देणार नावे
जिल्ह्यातील काही वाॅर्ड, तसेच वस्त्यांना जातीवाचक नावे असतील त्यावर त्यांचे नाव बदलून आता त्यावर त्यांना महापुरुषाचे नाव देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या नावांचाही विचार केला जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने आता पुढाकार घेतला असून, राज्यातील जिल्हा पातळीवर समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जातीवाचक वाड्या, वस्त्यांची नावे बदलवून नवीन नावे दिली जाणार आहेत.