जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकास अटक, अनेक जण रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:40 IST2019-08-14T20:40:08+5:302019-08-14T20:40:30+5:30
स्वप्निल पळसकर (४०, रा. वरूड) असे अटक केलेल्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाचे नाव आहे.

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकास अटक, अनेक जण रडारवर
अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मधील कोट्यवधीच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून जबानी आटोपल्यावर आरोपींचे अटकसत्र सुरू झाले आहे. त्यानुसार बुधवारी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकास अटक करण्यात आली. अनेक बडे मासेही पोलिसांच्या रडारवर आहेत.
स्वप्निल पळसकर (४०, रा. वरूड) असे अटक केलेल्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाचे नाव आहे. गणेश चौधरी याने १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीत नियमांचे उल्लंघन करून ६ कोटी १२ लाख ३९ हजार ९३५ रुपयांचा गैरव्यवहार केला, अशी तक्रार लेखाधिकारी दिगंबर नेमाडे यांनी ३ जुलै रोजी गाडगेनगर ठाण्यात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी गणेश चौधरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या काळात गणेश चौधरीने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने सदर अर्ज फेटाळून लावला.
उच्च न्यायालयाने अर्जावर सुनावणीदरम्यान गणेश चौधरीला ८ ते १० आॅगस्ट दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चौकशीसाठी अमरावती पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गणेश चौधरीने आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. पोलिसांच्या तपासात गैरव्यवहार प्रकरणात अनेकांची नावे पुढे आली. त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणात जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक स्वप्निल पळसकर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जामिनावर शुक्रवारी निर्णय
तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरीच्या जामीन अर्जावर १६ आॅगस्ट रोजी निर्णय होणार आहे. त्याच्या जामिनावर निर्णय झाल्यावर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येईल.