जिल्हा खाजेने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:32 PM2018-07-31T22:32:15+5:302018-07-31T22:33:59+5:30

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

The district suffers hunger | जिल्हा खाजेने बेजार

जिल्हा खाजेने बेजार

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांमध्ये चौपट वाढ : शंभरामागे २० रुग्ण

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्याच्या दिवसांत कपडे पूर्णपणे वाळत नसल्याने तेच परिधान केल्यास त्वचेवर लाल चट्टे पडतात. त्याला ‘रॅशेस’ असेही म्हणतात. वातावरणात बदल होत असल्याने पाणी व घामामुळे त्वचारोगात वाढ होत आहे. पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतल्यानंतर लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना याची पाठोपाठ लागण होत आहे. म्हणून हे इंन्फेक्शन पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याच्यावर उपचार घेण्याचा तसेच उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे.
अशी करा उपाययोजना
गजकर्ण झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवा. एकच फणी आणि एकमेकांचे कपडे वापरू नका. रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. बाह्य उपचारांबरोबरच पोटसुद्धा साफ असणे आवश्यक. त्वचा नेहमी कोरडी राहील, याची काळजी घ्या. वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घामाने आजार वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ शरीरावर पावडर लावा. ओले कपडे परिधान करणे टाळा.
विषाणू जाईपर्यंत आजार कायम
पूर्वी हा आजार बरा व्हायला जवळपास दोन आठवडे लागायचे. पण, आता औषध, मलम लावूनही लगेच बरा होत नाही. त्याचे डाग जायलाही जवळपास तितकेच महिने जातात. गजकर्ण बरा झाला, की पुन्हा येत नव्हता. पण, आता या आजाराचा विषाणू जोपर्यंत त्वचेतून पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत अधूनमधून हा आजार उद्भवत राहतो.
शरीराच्या या भागावर होतो आजार
हात, मान, चेहरा, कोपर, पोटावरील त्वचेवर, बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्वचेची आग होणे, खाज येणे, कपडे घट्ट घातलेल्या ठिकाणी खाज व चट्टे निर्माण होतात.

काही वर्षांपूर्वी १०० रुग्णांपैकी पाच ते सहा रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'चे असायचे. पण, आता दररोज २० ते २५ रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'वर उपचार घेण्यासाठी येत आहेत.
- डॉ. गणेश मुधडा,
त्वचारोगतज्ज्ञ अमरावती

Web Title: The district suffers hunger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.