जिल्हा आजपासून अनलॉक, वीकएंड कर्फ्यू बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:12+5:302021-06-16T04:16:12+5:30
अमरावती : बुधवारपासून जिल्हा अनलॉक होत आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केले. आदेशानुसार, ‘वीकएंड’ कर्फ्यू ...
अमरावती : बुधवारपासून जिल्हा अनलॉक होत आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केले. आदेशानुसार, ‘वीकएंड’ कर्फ्यू बंद झाला आहे. याशिवाय सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्यास संबंधिताकडून ३५ हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात चैतन्य परतले आहे. आता जीवनावश्यक व अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपेयाची दुकाने, मॉल्स, पिठाची गिरणी, दुग्धविक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दूधवितरण व्यवस्था, कृषिसेवा केंद्रे, कृषिप्रक्रिया उद्योग, शेती उत्पादनासंबंधी सर्व दुकाने, सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने, सर्व प्रकारची मद्यालये, बांधकामे, शासकीय रेशन दुकाने, चष्माची दुकाने , सलून, ब्युटी पार्लर आदी नियमितपणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत सुरू राहतील. याशिवाय हॉटेल, रेस्टाॅरेंट व बार, खाणावळ, शिवभोजन थाली सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहेत. आरोग्यसेवा नियमित सुरु राहतील.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, लसीकरण, टेस्टिंग व आयसोलेशन या पंचसूत्रीचा वापर अनिवार्य आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
बॉक्स
शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू
सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय कार्यालये १० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येतील. शक्य असल्यास ऑनलाईन बैैैठकी घेण्याच्या सूचना आहेत. याशिवाय सकाळी ५ ते सांयकाळी ७ पर्यंत मैदानी खेळास परवानगी आहे, तर आंतरप्रेक्षागृहातील खेळ मात्र बंद राहणार आहे.
बॉक्स
खासगी कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेने
कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी वर्ग, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, ग्रंथालये, वाचनालये, जिम, व्यायामशाळा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. मात्र, प्रत्येक बॅचमध्ये जास्तीत जास्त दहापर्यंतची संख्या किंवा आसनक्षमतेच्या पन्नास टक्के, यापैकी जी संख्या कमी असेल तसेच दोन बॅचमध्ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉलचे, तसेच संगणक साहित्याचे निर्जंतुकीकरण बंधनकारक राहील.
बॉक्स
लग्न समारंभात ५० उपस्थितांना मुभा
लग्न समारंभ (आचारी, वाजंत्री, वधू-वरपक्षसह), सामाजिक तथा राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलने ५० लोकांच्या उपस्थितीत आयोजित करता येतील. मात्र, असे कार्यक्रम सायंकाळी ५ पूर्वी पार पाडावे. अशा आयोजनाला पूर्वपरवानगी आवश्यक असून, त्यासाठी संकेत स्थळावर ‘इव्हेंट परमिशन’बाबत स्वतंत्र दालन आहे. त्यावर क्लिक करून अर्ज करता येईल व अर्जाची स्थितीही तपासता येईल.
बॉक्स
अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत करावा लागणार आहे. शाळा-महाविद्यालयांना अद्याप परवानगी नाही. उत्पादनक्षेत्रातील उद्योग कोविड नियमांचे पालन करून पूर्णवेळ सुरू राहतील. याशिवाय चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बहुविध चित्रपटगृहे यांच्या आसनक्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीला सायंकाळी ७ पर्यंत परवानगी आहे.
बॉक्स
पूर्ण आसनक्षमतेसह वाहतुकीला परवानगी
पूर्ण आसनक्षमतेसह वाहतुकीला परवानगी राहील. तथापि, प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. मालवाहतूक पूर्णवेळ सुरू राहील. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक होत असल्यास, १० टक्क्यांपेक्षा जास्त कोविड पॉझिटिव्हिटी असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांना ई-पास आवश्यक आहे.
बॉक्स
लग्नात ५० पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास ५० हजारांचा दंड
लग्न समारंभात मंगल कार्यालयांमध्ये ५० पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास संबंधित चालक, मालक व आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम ५० हजारांचा दंड व दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्स न पाळल्याबद्दल प्रतिष्ठानांवर हीच कारवाई करण्यात येईल.