जिल्ह्यातील दक्षता समिती अध्यायपही लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:56+5:302021-04-15T04:12:56+5:30
अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून विविध उपाययोजनांची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर सोपविली आहे. मात्र, ...
अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून विविध उपाययोजनांची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर सोपविली आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातील काही अपवाद वगळला सर्व समित्या लॉक असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गाव पातळीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आणि आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने दक्षता समित्यांची स्थापना केली आहे. मात्र सध्या जिल्ह्यात काही अपवाद वगळता बहुसंख्य गावात या समित्या नावापुरत्याच उरल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोना संदर्भातील उपायोजना आवश्यक त्याप्रमाणात राबविल्या जात नाही. परिणामी याच निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भविष्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच पुढाकार घेऊन दक्षता समित्या ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच होमआयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड करण्याचा अधिकार या समितीला आहे. त्यानुसार गतवर्षी नियम मोडणाऱ्या अनेकांवर या समित्यांनी कारवाई केली होती. परिणामी लोकांमध्ये समितीची जरब बसली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली होती. दरम्यान तीन चार महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यात अनेक गावात निवडणुकीचे वातावरण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्ता बदल झाल्याने गाव कारभारी बदलले. अशातच गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. दररोज वेगाने बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. मात्र दुसरीकडे दक्षता समिती निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. परिणामी बाहेरगावावरून, परराज्यातून परदेशातून गावात येणाऱ्यांवर वॉच ठेवला जात नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदी काम करीत असलेल्या यांनी दक्षता समित्या निवांत आहेत. ही बाब लक्षात घेता समितीतील पदाधिकारी सदस्यांनाही धोका ओळखून वेळीच कार्य करण्याची आज गरज आहे.
बॉक्स
लोकांचा वाईटपणा घेणार कोण?
स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच या समिती अध्यक्ष आहेत. पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व गावातील काही जागरूक नागरिक या समितीचे सदस्य आहेत. मात्र लोकांचा वाईटपणा कशाला घ्यायचा, असा सूर या समिती सदस्यातून उमटत आहे.