प्रक्षुब्ध मनाचा...नि:शब्द हुंकार
By Admin | Published: September 18, 2016 12:11 AM2016-09-18T00:11:11+5:302016-09-18T00:11:11+5:30
गुरुवार २२ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा प्रक्षुब्ध मनाचा ...नि:शब्द हुंकार ठरणार आहे.
मराठा क्र ांती मोर्चा : आज नियोजन बैठक
अमरावती : गुरुवार २२ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा प्रक्षुब्ध मनाचा ...नि:शब्द हुंकार ठरणार आहे. सकाळी ११ वाजता नेहरू मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. त्याअनुषंगाने शेवटची नियोजन बैठक रविवार १८ सप्टेंबरला होऊ घातली आहे. नागपूर मार्गावरील गौरी ईन या हॉटेलमध्ये ही बैठक होईल. यात केवळ नियोजनाशी संबंधित असलेला मराठा बांधव सहभागी होतील.
कोपर्डी येथील घटनेतील गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हा स्तरावर स्वतंत्र वसतिगृहे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात यावीत, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला त्वरित शासकीय मदत अणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, शेतमालाला योग्य तो भाव देऊन बहुसंख्येने शेतकरी असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी हा मराठा क्रांती मूकमोर्चा काढला जात आहे. या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे एक ते दीड लाख मराठे एकत्र येत असल्याचा अंदाज आहे. या भव्य मोर्चाच्या सूक्ष्म नियोजनासाठी रविवारी शेवटची बैठक होत आहे.
मराठा क्रांती मोर्चासाठी तालुक्यात नियोजन
चांदूररेल्वे : कोपर्डी येथे झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात २२ सप्टेंबर रोजी अमरावती येथे निघणाऱ्या विशाल मूकमोर्चातसहभागी होण्यासाठी तालुक्यातील मराठा समाज एकवटत आहे. त्यासाठी बांधणी सुरू आहे, अधिकाधिक समाज बांधव मोर्चात सहभागी व्हावे यासाठी रविवारी शहरात मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातून २० हजारांवर मराठा समाज जमणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले, त्यासाठी शुक्रवारी स्थानिक शेतकरी भवनात बैठक घेण्यात आली. सदर मोर्चा कुठल्याही जातीच्या, समाजाविरुद्ध नसून, हा मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी व्यवस्थेकडे होणारा आक्रोश आहे, मोर्चात सर्व कुटुंबीयांनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तिवस्यात मराठा मोर्चासंबंधी कार्यालयाचे उद्घाटन
तिवसा : मराठा क्रांती मूकमोर्चा अमरावती येथे २२ सप्टेंबरला निघणार आहे. यासंदर्भात मराठा बांधवांना संवाद साधण्यासाठी तिवसा येथे मराठा क्रांती मूक मोर्चा कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. पंचायत समितीजवळील एका व्यापारी संकुलमध्ये हे कार्यालय आहे. या कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या मुर्तीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गौरी नामक एका मराठा तरुणीच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.