विभागीय आयुक्तांची एंट्री अन् ‘इर्विन’ची बत्ती गुल
By उज्वल भालेकर | Published: May 8, 2024 08:00 PM2024-05-08T20:00:37+5:302024-05-08T20:00:55+5:30
वीज नसल्याने चिमुकल्यांना घेऊन व्हरांड्यात झोपल्याची पालकांची तक्रार
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे बुधवारी विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी भेट दिली असता, त्याच वेळी रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित असल्याचे चित्र पाहायला मिहाले. रुग्णालयातील वॉर्ड क्र. ५ हा बालरुग्ण विभाग असून येथील पालकांनी रात्रीपासून वीज नसल्याची तक्रार आयुक्तांकडे केली. रात्री वीज नसल्याने चिमुकल्यांना रुग्णालयातील व्हरांड्यात घेऊन झोपावे लागल्याची खंतही यावेळी रुग्णांनी बोलून दाखविली. त्यामुळे रुग्णालयातील विजेचा लपंडाव कायमचा केव्हा थांबणार, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय हे इतर शासकीय रुग्णालयांचे रेफर सेंटर असल्याने येथे रोज विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रुग्ण हे उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच सध्या जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता, रुग्णालयात उष्मघात कक्षाचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रुग्णालयातील औषधी तसेच रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सुरुवातीला जळीत वाॅर्ड क्र. ४ मध्ये भेट दिली असता या ठिकाणी वीज नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी बालरुग्ण विभाग असलेल्या वॉर्ड क्र. ५ मध्ये भेट दिली. या वेळी या ठिकाणीही वीज नसल्याचे दिसून आले. या वेळी रात्रीपासूनच वॉर्डात वीजपुरवठा नसल्याची तक्रार काही बालरुग्णांच्या पालकांनी केली. रात्री १२ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्री साडेतीन वाजता सुरू झाला. परंतु, त्यानंतरही वारंवार विजेचा लपंडाव सुरू राहिल्याने संपूर्ण रात्र ही रुग्ण बालकांना घेऊन रुग्णालयाच्या व्हरांड्यात काढावी लागल्याचा रोष यावेळी पालकांनी व्यक्त केला. यावेळी विजेचा लोड वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने आयुक्तांना दिली.